नवी मुंबईचे शिल्पकार असणाऱ्या लोकनेते गणेश नाईकांचा पराभव हा नक्कीच धक्कादायक व अनपेक्षित होता. एकीकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आमदार संदीप नाईक मोदी लाटेला चारी मुंड्या चीत करून दणदणीत विजयी होत असताना बेलापुर विधानसभा मतदारसंघातून लोकनेते गणेश नाईकांना पराभूत व्हावे लागले. ही बाब खरोखरीच गणेश नाईकांना विचारमंथनास प्रवृत्त करावयास लावणारी आहे. नवी मुंबईकरांवर आजही लोकनेते गणेश नाईकांच्याच विचारांचा आणि धोरणांचा प्रभाव आहे. विकासकामे केल्यावर व लोकांच्या अडीअडचणीला धावून गेल्यावर मतदार जाण ठेवतात व त्याच माणसाला निवडून देतात, हा समजही लोकनेते गणेश नाईकांच्या पराभवामुळे खोटा ठरला. गणेश नाईक कामे करूनही आणि जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांची प्रशासन दरबारी प्रलंबित असलेली कामे करूनही पराभूत झाले. परंतु या पराभवाचा खोलात जावून विचार केल्यास विरोधकांना अथवा मोदी लाटेला दोष न देता गणेश नाईकांनी पराभवाचे आत्मपरिक्षण त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीपासूनच करावयास हवे. इतर पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सकाळी नऊ ते दहा वाजल्यापासून प्रचारयंत्रणेत झोकून देत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकांश नगरसेवक, पदाधिकारी बोनकोडेतून अथवा व्हाईट हाऊसमधून मिठाई कधी येते याची प्रतिक्षा करत असल्याचे निवडणूक काळात आम्हाला जवळून पहावयास मिळाले.
विधानसभा निवडणूकीनंतर अवघ्या सात महिन्यात झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला काठावरचे का होईना बहूमत मिळाले. एकीकडे बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला असताना व दुसरीकडे ऐरोली व बेलापुर या दोन विधानसभा मतदारसंघातील विरोधकांना मिळालेल्या आकडेवारीची जमाबेरीज केली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक इतक्या संख्येने निवडून यावे व त्यांना इतके दणदणीत मताधिक्य मिळावे याचा आता गणेश नाईकांनी गांभीर्याने विचार करावयास हरकत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच नगरसेवकांनी मनापासून विधानसभा निवडणूकीत काम केले नसावे, स्वत: पालिका निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे असताना आपल्या प्रभागातील बाहेर असलेली मते ज्या प्रकारे गांभीर्याने मतदानाला आणून मतदान केंद्रापर्यत पोहोचविली जातात, तशी प्रक्रिया विधानसभा निवडणूकीच्या वेळी कोणीही गांभीर्याने राबविली नाही. कारण अशा स्वरूपात काम केले असते, बाहेरील मतदारांना आणून मतदान केंद्रापर्यत पोहोचविले असते तर लोकनेते गणेश नाईक १३०० मतांनी पराभूत न होता १३००० मतांनी विजयी झाल्याचे पहावयास मिळाले असते. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही अतिशहाणे नगरसेवक हे पालिका निवडणूकीत स्थानिक उमेदवार पाहून मतदान केले जात असल्याने हा फरक पडल्याचे खासगीत सांगत आहे. लोकनेते गणेश नाईकांच्या पराभवामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची आणि नाईक परिवाराची जितकी हानी झाली नसेल, त्याहून कैकपटीने हानी आज नवी मुंबई शहराची झालेली आहे. लोकनेते गणेश नाईक म्हणजेच नवी मुंबई अशी महाराष्ट्राच्या विधानभवनात नवी मुंबईची ओळख होती. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे नगरसेवक स्थानिक निवडणूकीत उमेदवार पाहून मतदान होते असे सांगत आहेत, त्यांच्या मूर्खपणाची खरोखरीच किंव करावीशी वाटते. आज नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणारे मतदान हे गणेश नाईकांना होणारे मतदान असते हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. जर या नगरसेवकांची हीच धारणा असेल तर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची कास धरून अन्य पक्षातून निवडणूक लढवून निवडून येण्याचे धाडस दाखवावे. काही बाहूबली नगरसेवकांचा अपवाद वगळता नाईकांची कास सोडणारे आज राजकारणातून अलिप्त होवून वैराग्याचे जीवन जगत असल्याचे नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळत आहे.
गणेश नाईकांचा पराभव हा मोदी लाटेने नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या गाफीलपणामुळेच झाला. आपल्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर व नगरसेवकांवर ठेवलेला चुकीचा अतिविश्वास याही गोष्टी त्यास कारणीभूत आहेत. लोकसभा निवडणूकीत तब्बल ४७ हजाराची पिछाडी मिळाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निराशेचे वातावरण होते. पुढच्या राजकीय भविष्याबाबत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट स्पष्टपणे पहावयास मिळत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नगरसेवक, पदाधिकारी आपसात चर्चा करताना विधानसभा निवडणूकीत ‘एक वेळ दादा कसेही सीट काढतील, पण भाईचे अवघड आहे’ अशी उघडपणे भाकीतेही करत होते. अनेकांनी पक्ष बदली करण्याचा सल्लाही नाईक परिवाराला वेळोवेळी देण्याचे धाडस दाखविले. जहाज बुडू लागल्यावर उंदीर पळ काढतात, तसेच चित्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवी मुंबईत झाल्याचे पहावयास मिळाले. दादा जिंकणार व भाई पडणार अशी वलग्ना मारणारे नाईक समर्थक बेलापुर मतदारसंघात प्रचार यंत्रणेत गाफील राहत अतीआत्मविश्वासाने वावरत होते, त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने गणेश नाईकांवर पराभूत होण्याची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला तोंडघशी पडण्याची वेळ आली. कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवक असा मोठा संख्येने ताफा असल्यावर विजयी होता येते हा समज भाजपच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी चुकीचा ठरवला. अनेक प्रभागात मंदाताई म्हात्रेंकडे कार्यकर्ते, पदाधिकारी नसताना तसेच निवडणूकीत अगदी बुथवर बसण्यास कार्यकर्त्यांचा दुष्काळ असतानाही मंदाताई विजयी झाल्या. भाई पडणार ही राष्ट्रवादीच्या छावणीत असणारी कुजबुज आमदार संदीप नाईकांच्या कानावर पडत होती. मितभाषी असणारे संदीप नाईक बोलत कमी असले तरी त्यांची कृती मात्र बोलकी असते. विरोधकांना धडकी भरविणारी असते आणि आपल्याच छावणीतील बिभिषणांना प्रबोधन करणारी असते. गणेश नाईकांचा पराभव हा मोदी लाटेने केला नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अतीआत्मविश्वासी फाजील प्रवृत्तींनी घडवून आणला. प्रचारयंत्रणेत ऐरोलीच्या तुलनेत बेलापुरात सुस्तपणा होता. अतीआत्मविश्वास होता. विधानसभा निवडणूकीत भाई आले आणि दादा पडले.
आताही लोकसभा निवडणूका अवघ्या पाच महिन्यावर आणि विधानसभा निवडणूका अकरा महिन्यावर आलेल्या असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीत शिथिलताच आहे. पक्षाचे वारंवार मेळावे होत असले आणि या मेळाव्यांना गर्दी जमत असली तरी हे भक्कम पक्षबांधणीविषयीचे सुखद चित्र नक्कीच नाही. नाईकांनी विधानसभा व लोकसभा निवडणूका जवळ आलेल्या असल्याने मोर्चेबांधणीला जमिनीवर उतरून आताच सुरूवात करणे काळाची गरज आहे. १११ प्रभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवक आणि पक्षाच्या इतर सेलमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जमाबेरीज पाहता मेळाव्यासाठी विष्णूदास भावे नाट्यगृह भरणे अथवा आगरी-कोळी भवन भरविणे म्हणजे फारसे दिव्य केले असल्याच्या भ्रमात कोणी असेल तर तो आपल्याच हाताला बेडकी फुगवून दाखवून ताकदीचा आभास निर्माण करण्यासारखे आहे. त्यामुळे बोनकोडेकरांनी मृगजळाच्या आहारी न जाता जमिनीवर येवून वस्तूस्थितीची जाणिव करून घेणे आवश्यक आहे.
बाकीचा भाग उद्याच्या अंकात