मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरेयांनी मागे घेतल्याने बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद अखेरीस संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा उठवत उद्धव ठाकरे यांनी त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा जयदेव यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी करण्यात आली होती. दोन वेगवेगळ्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी सुरू होती. याप्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती. तर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात प्रोबेट दाखल करून मृत्यूपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर थेट सुनावणी करू नये, आम्हाला त्याची माहिती द्यावी, अशी विनंती कोर्टाला केली होती. दरम्यान, आता जयदेव यांनीच याचिका मागे घेतल्याने हे प्रकरण संपुष्टात आलं आहे.