नवी मुंबई – घणसोली येथील पालिकेच्या ई टॉयलेट मध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. या स्फोटात हर्ष शिंगटे (१८) हा गंभीर जखमी झाला असून त्याचा चेहरा व हात जळाले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घणसोली सेक्टर ७ येथील मैदानातील ई टॉयलेट मध्ये हा प्रकार घडला. सिम्प्लेक्स परिसरात राहणार हर्ष शिंगटे (१८) हा सदर ई शौचालयात गेला होता. त्याचवेळी भीषण स्फोट होऊन शौचालयाचे तुकडे परिसरात दूरपर्यंत उडाले. तर स्फोटानंतर झालेल्या आगीमुळे हर्ष याचा चेहरा, दोन्ही हात व गळा ४० टक्केहून अधिक भाजला आहे. स्फोटाच्या आवाजाने जमलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या फ्रीशॉन रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नगरसेवक प्रशांत पाटील, सुरेश संकपाळ, कृष्णा पाटील, संदीप गलुगडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विभाग अधिकारी दत्ताञय नांगरे व रबाळे पोलिसांना धारेवर धरत स्फोटाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सदर मैदानात रात्रीच्या वेळी काही मुळे नशा करत बसलेली असतात. यामुळे स्फोटाच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचीही त्यांनी मागणी केली. त्यानुसार रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.
———————- ———————
नेरूळमधील मल:निस्सारण चेम्बर्स मोजणीकडे कानाडोळा
नेरुळ सेक्टर सहामधील व सारसोळे गावातील मल:निस्सारण चेम्बर्सची मोजणी करण्यात यावी यासाठी महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर व पत्रकार संदीप खांडगेपाटील सातत्याने लेखी स्वरूपात मागणी करत आहेत. महापालिका विभाग कार्यालय, महापौर व आयुक्त दालनात चपला झिजवित आहे. महापालिकेने ज्यावेळी मल:निस्सारणच्या चेम्बर्सची (मोजणी) केली, त्यावेळी पालिका कर्मचारी व अधिकारी याऐवजी ठेकेदाराचीच माणसे पुढाकार घेत होती. पालिका प्रशासनाने कागदोपत्री सादर केलेली मल:निस्सारण चेम्बर्स (झाकणांची) आकडेवारी व प्रत्यक्षातील आकडेवारी यात तफावत आहे. त्यामुळे इन कॅमेरा ही मोजणी करण्याची मागणीही मनोज मेहेर आणि संदीप खांडगेपाटील यांच्याकडून सातत्याने केली जात असताना या मागणीला केराची टोपली दाखविली जात आहे. सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण चेम्बर्स (झाकण) घोळ हा गेल्या काही महिन्यापासून नवी मुंबईकरांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.