आपला देश १९४७ साली स्वतंत्र झाला असला तरी देशाला घटनात्मक अधिकार २६ जानेवारी १९५० रोजी प्राप्त झाला आहे. १९५२ पासून देशामध्ये सार्वत्रिक निवडणूकांना सुरूवात झालेली आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीमध्येही लोकसभेपासून ते थेट ग्रामपंचायतीपर्यत आयाराम-गयाराम मोठ्या संख्येने पहावयास मिळतात. निवडणूकांचे पडघम वाजताच मोठ्या संख्येने आयाराम-गयाराम आपल्या नजरेस पडतात. अर्थात नवी मुंबई कार्यक्षेत्रात कार्यरत असणारे अधिकांश मातब्बरांनी आपले पक्ष सोडल्याचे दिसून येते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांना अवघ्या पाच महिन्याचा कालावधी राहीलेला असताना पुन्हा एकवार नाईक परिवाराच्या भूमिकेबाबत चावडी गप्पांना गेल्या काही महिन्यापासून जोर धरू लागला आहे. अर्थात या गप्पांमध्ये अफवांचा अथवा पुड्या सोडण्याचा अधिक प्रकार आहे. नवी मुंबईत नाईक परिवाराची भूमिका गेल्या तीन दशकाहून अधिक काळ महत्वाची असल्याने ते काय भूमिका घेतात यावरही अनेक पक्षातील आयाराम गयाराम आपल्या भावी राजकीय वाटचालीचा निर्णय घेणार आहेत.
ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्याबाबत नवी मुंबईकरांमध्ये एक आशावादी व विश्वसनीय दृष्टीकोन व्यक्त केला जात आहे. संदीप नाईक हे गेली साडे १३ बर्ष महापालिका ते विधानभवन प्रतिनिधीत्व करत असले तरी सामाजिक कार्यात ते पूर्वीपासूनच सक्रिय आहे. संदीप नाईकांच्या नेतृत्वाबाबत नवी मुंबईकर आशावादी का आहेत, या प्रश्नाचे उत्तर पहावयास झाल्यास त्यांच्या कार्यप्रणालीकडे पहावे लागले. नवी मुंबईतील अन्य राजकारणी व संदीप नाईक यांच्यात जमिन आसमानचा फरक आहे. राजकारणात व समाजकारणात चर्चेत राहण्यासाठी संदीप नाईकांनी कधीही चमकेशगिरी केली नाही व यापुढील काळातही ते चमकेशगिरी करणार नाहीत याची नवी मुंबईकरांना खात्री आहे. नगरसेवक असो वा आमदार अथवा एक यशस्वी उद्योजक असो, प्रत्येक भूमिकेला संदीप नाईकांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. संदीप नाईक हे एक उच्चशिक्षित नेतृत्व असल्याचा नवी मुंबईकरांना अभिमान आहे. शिक्षणाला विनम्रतेचा साज असल्यावर सर्वसामान्यांशी सहजपणे जवळीक साधता येते ही संदीप नाईकांची धारणा आहे.
आज महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ताधारी असली तरी लोकसभा व विधानसभा निवडणूका या पक्षसंघटनेच्या ताकदीवर लढविल्या जातात. शिवसेना व भाजपच्या तुलनेत आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षसंघटना खिळखिळी झालेली आहे. ज्या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत, त्या त्या प्रभागाचा आढावा घेतल्यास पक्षीय पदाधिकारी केवळ नामधारी बनले असून केवळ ‘होयबा’च्या भूमिकेत ते वावरताना दिसतात. ज्या ठिकाणी नगरसेवक नाहीत, त्या ठिकाणीही पक्षीय पदाधिकारी फारशी चमकदार कामगिरी करताना दिसत नाही. पक्षसंघटनेचा विचार करता आजमितीला शिवसेना एक नंबरवर आहे. कालपरवापर्यत नवी मुंबईत फारसा खिजगणतीतही नसलेला भाजप नव्याने कात टाकून पक्षसंघटना भक्कमरित्या बांधत आहे. कॉंग्रेस पक्ष आजही गटबाजीत विखुरलेला असून या गटबाजीचा मनोमिलाफ प्रत्यक्षात राहूल गांधी जरी नवी मुंबईत आले तरी होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रभागाप्रभागात स्वंयभू नेतेमंडळी वाढीस लागल्याने पक्षसंघटनेकडे कानाडोळा होवू लागला आहे. नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोन विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास ऐरोलीत काही प्रमाणात सुखद चित्र असले तरी बेलापुर मतदारसंघात आजही सावळागोंधळ असून राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी पर्यायाने नाईक परिवारासाठी हे सुखद चित्र नाही.
बेलापुर मतदारसंघातील वाशी खाडीपुलापासून वाशी गाव, पामबीच परिसर, सानपाडा नोड, जुईनगर राजीव गांधी उड्डाण पुलापर्यतचा परिसर या भागात पाहणी केली असता कोणत्या प्रभागातून आपणास निसटते का होईना बहूमत मिळेल असा एकही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्ता छातीठोकपणे सांगू शकत नाही. या भागावर वाशी गावातील कॉंग्रेसच्या वाशी गावातील भगत परिवाराचा प्रभाव आहे. गतविधानसभा निवडणूकीत या भागातून शिवसेनेच्या विजय नाहटांना बहूमत कसे मिळाले आणि कोणी त्यांच्यासाठी उघडपणे तर कोणी पडद्याआडून काम केले या गोष्टींकडे कानाडोळा करून चालणार नाही. जुईनगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तनुजा मढवी नगरसेविका असल्या तरी या भागात भाजपच्या काशिनाथ पाटील व डॉ. राजेश पाटील यांनी मारलेली मुसंडी धोक्याची घंटा ठरू शकते. नेरूळ पूर्वेला मातब्बरांचा भरणा असला तरी हे मातब्बर केवळ नावापुरतेच आणि नाईकांच्या पुढे मागे वावरून पालिका सभागृहात मोठी पदे मिळविणे व चमकेशगिरी करणे यापुरतेच हे मातब्बर सिमित राहीलेले आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीत नेरूळ पूर्वेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पालापाचोळा झाला होता. महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून आले असले तरी विधानसभा निवडणूकीत येथील मतदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपलाच अधिक जवळ करणार असल्याचे चित्र आहे. नेरूळ पूर्वेकडील एक मातब्बर मागील पालिका निवडणूकीत कमळाचा सहवास घेण्यास उत्सूक होता. ऐनवेळी घडामोडी घडल्याने या महाभागाला राष्ट्रवादीत राहणे भाग पडले. आजही या कलाकाराविषयी राष्ट्रवादीत फारसे विश्वासाने पाहिले जात नाही.
नेरूळ पश्चिमचा विचार करता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे काही बाहूबली असले तरी त्यांच्याच प्रभागात त्यांच्या अस्तित्वाला सुरूंग लागण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षात नेरूळ पश्चिमेला भाजप या परिसरात आक्रमक होत चालला आहे. शिवसेनेचा सर्वाधिक प्रभाव नेरूळ पश्चिमेला दिसून येतो. सुरज पाटील हे प्रभावी असले तरी त्यांचा ८५ व ८६ या दोन प्रभागांपुरताच प्रभाव सिमित आहे. त्यातही विधानसभा निवडणूकीत त्यांना बहूमत मिळवून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गणेश भगत त्यांच्या प्रभागात कामे करत असले तरी या प्रभागात शिवसेना-भाजपचा वाढत्या प्रभावाकडे कानाडोळा करून चालणार नाही.
सिवूडस भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकांश नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असले तरी विधानसभा निवडणूकीत येथील सुशिक्षित मतदार भाजप-शिवसेनेला अधिक अनुकूल आहेत. मागील विधानसभा निवडणूकीत नेरूळ जिमखान्यापासून झालेल्या मतमोजणीत भाजपला मिळालेली मते विसरून चालणार नाही. बेलापुर,आग्रोळी परिसरातील मतदारांमध्ये असलेली आमदार मंदाताईविषयीची जवळीक व भावनिक आस्था राष्ट्रवादी कॉंग्रेसची डोकेदुखी वाढविणारी आहे.
मेळावे घेणे व गर्दी जमविणे आणि त्याची सोशल मिडीयावर मार्केटींग करणे यावर कोणी विसंबून राहणार असले तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत असणार. नेरूळमध्ये एकाद्या गरीबाचे लग्न असले तरी नेरूळमधील आगरी-कोळी भवनात तुडूंब गर्दी होते. बेलापुर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला वातावरण आजही ‘आलबेल’ नाही याची बोनकोडेकरांनी वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. गौरव बंगल्यावर आजही राष्ट्रवादीतील अनेक जणांचा राबता असल्याने ऐन निवडणूक हंगामात या बिभिषणांकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युती असली नेरूळ पूर्वेला संतोष शेट्टी कितपत आघाडी धर्माला जागतील याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. कारण नेरूळ पूर्वेला मागील निवडणूकीत उघडपणे शिवसेनेच्या विजय नाहटांचे काम केले होते आणि भाजपच्या एका सुनिलने कोणा मातब्बराला धक्काबुक्की केली होती ते विसरून चालणार नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असली तरी या आघाडीचा राष्ट्रवादीला कितपत फायदा होईल आणि कॉंग्रेसचे घटक कितपत मनापासून राष्ट्रवादीला सहकार्य करतील याबाबत सावळागोंधळ कायम आहे.
सर्वत्र निराशेचे वातावरण असताना आता कुरूक्षेत्रावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाची धुरा संदीप नाईकांनी सांभाळणे काळाची गरज आहे. राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही तीच अपेक्षा आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत संदीप नाईकांनी स्वत:ला ऐरोली मतदारसंघापुरतेच मर्यादीत ठेवणे हे त्यांच्यातील प्रतिभेवर अन्याय करण्यासारखे आहे. बेलापुर हा सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे उच्चविद्याविभूषित असलेल्या संदीप नाईकांनी आपल्या लाजऱ्याबुजऱ्या, मितभाषी स्वभावाला मुरड घालून नव्याने कात टाकणे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी आवश्यक आहे. सिडको वसाहतीमध्ये कंडोनिअमअंतर्गत कामे व्हावीत यासाठी महापालिकेच्या तिसऱ्या सभागृहात वावरताना संदीप नाईकांनी मंत्रालयात चपला झिजविल्या होत्या आणि संदीप नाईकांच्या भगिरथ पाठपुराव्यामुळेच मंत्रालयातून या कामाला हिरबा सिग्नल भेटला होता हेही सिडकोच्या सदनिकाधारकांना माहिती आहे. ऐन मुसळधार पावसात तुंबलेल्या नाल्यातील कचरा काढण्यासाठी गळ्याएवढ्या पाण्यात उतरणारे संदीप नाईकच होते हेही नवी मुंबईकरांना माहिती आहे. असा नेता ऐरोलीपुरता सिमित न राहता समस्त नवी मुंबईचे नेतृत्व संदीप नाईकांनी करावे अशी धारणा आता नवी मुंबईकर उघडपणे व्यक्त करू लागले आहे. संदीप नाईक आज ऐरोलीचे आमदार असले तरी बेलापुर मतदारसंघात त्यांचे एक वेगळे जाळे आहे. मित्र परिवार आहे. बेलापुर मतदारसंघातील घडामोडीचा आढावा आमदार मंदाताई म्हात्रे अथवा लोकनेते गणेश नाईकांपेक्षाही संदीप नाईकांना त्वरीत कळतात, इतके संदीप नाईकांचे ठिकठिकाणी बहीर्जी नाईकांचे जाळे विखुरलेले आहे. सर्वपक्षीय युवा पदाधिकाऱ्यांशी संदीप नाईकांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला जे ठिकठिकाणी प्रतिकूल वातावरण दिसत आहे, संदीप नाईक खेळपट्टीवर उतरल्यास अवघ्या तीन ते चार महिन्यात ते वातावरण अनुकूल झाल्याचे पहावयास मिळेल. जे बिभिषण आज गौरव बंगल्यावर जातात, त्यांना चाप बसेल. संदीप नाईक आलेत, येणार आहेत हे समजले तरी तळागाळातील कार्यकर्त्यात एक नवा उत्साह निर्माण होईल, आम्ही भाजपला पाडू शकतो हा विश्वास त्यांच्यात निर्माण होईल. संदीप नाईकांनी ऐरोली विधानसभाच लढवावी, ती त्यांची खेळपट्टी आहे, परंतु काळाची गरज म्हणून बेलापुर मतदारसंघाच्या रणनीतीचे नेतृत्व त्यांनी करणे आवश्यक आहे. संदीप नाईक बेलापुरात सक्रिय झाल्यास दशरथ भगत व निशांत भगत हेही हातात हात घालून येतील. नेरूळ पूर्वेला संतोष शेट्टींनाही संदीप नाईकांशी असलेल्या मैत्रीमुळे आपल्यातील राजकीय कलागुणांना मुरड घालावी लागेल. सिवूडस भागातील अन्य पक्षातील घटकांना पडझडीच्या काळात संदीप नाईकांनी मदत केल्यामुळे त्यांनाही मत्रीमुळे न्यूट्रल राहणे भाग पडेल. वेळ अजूनही गेलेली नाही. सर्व काही संदीप नाईकांच्या हातात आहे. निर्णय शेवटी संदीप नाईकांनाच घ्यावा लागणार आहे.
समाप्त