नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समधील चायनीजवाल्यांची अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकार्यांकडे शनिवारी एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ८ मधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समधील चायनीज दुकानांची अतिक्रमणे, पदपथावर आलेली दुकाने, व्यवसायानिमित्त बळकावलेल्या मोकळ्या जागा ही बाब जगजाहिर असताना महापालिकेचा अतिक्रमण विभाग आजवर केवळ बघ्याचीच भूमिका घेत आहे. या चायनीज दुकांनचालक बिनधास्तपणे अतिक्रमण करून आपला व्यवसाय करत असतानाही पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग कानाडोळा करत आहे, याचा अर्थ नेरूळवासियांनी काय घ्यायचा, याचेच महापालिकेने स्पष्टीकरण करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.
महापालिका प्रभाग समिती सदस्य या नात्याने प्रभाग समितीच्या बैठकीत हा मुद्दा सतत मांडला असतानाही कारवाई होत नाही. केवळ बैठकीत मुद्दा मांडला म्हणून इतिवृत्तात दखल घेतली जाते. चायनीजवाले महापालिका प्रशासनाचे उपकारकर्ते आहेत काय की जेणेकरून त्यांच्या अतिक्रमणाला महापालिका प्रशासन राजमान्यता देत आहे. अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये पहिल्या मजल्यावर विविध दवाखाने व रूग्णालये असून सांयकाळी आठनंतर तेथील चित्र काय आहे, याची आपण पाहणी करावी. आपण शक्य तितक्या लवकर तेथील चायनीज चालकांनी केलेली अतिक्रमणे हटविण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत आणि अतिक्रमण करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या अतिक्रमणामुळे परिसराला बकालपणा येत असून परिसराच्या सौंदर्यासही बाधा निर्माण होत आहे. याप्रकरणी आपण काय कार्यवाही केली याबाबतचा लेखी अहवाल देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.