नवी मुंबई : पुर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल. मुंबई, नवी मुंबई,एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र ‘महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल, त्यासाठी शासन विकासाचे नियोजन व प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खारकोपर ता. पनवेल येथे केले.
नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा रविवारी खारकोपरपर्यंत सुरू झाली. या सेवेचा उद्घाटन सोहळा आज खारकोपर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी नेरुळ सीवूडस दारावे/ बेलापूर-खारकोपर (फेज १) नवीन लाईन व पनवेल-पेण विद्युतीकरण कार्याचे उद्घाटन, बेलापूर/नेरुळ-खारकोपर विभागातील ई एम यु सेवेचे उद्घाटन,वसई रोड-दिवा-पनवेल- पेण विभागातील मेमू सेवेचे उद्घाटन, उंबरमाली व थानसीत येथे नवीन उपनगरीय स्थानकांची पायाभरणी तसेच परळ स्टेशन नवीन प्लॅटफॉर्म, शिवडी,मुंब्रा, भांडूप, परळ, कळवा, घाटकोपर येथे नवीन ओव्हरब्रिज, सर्वच २७३ उपनगरीय रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्मचे उंची ९००मिमी ने वाढवली २३ स्थानकांवर ४१ एक्सलेटर्स, ६स्थानकांवर १०लिफ्ट, ६ स्थानकांवर नवीन शौचालय, ७७ स्थानकांवर ३१८ एटीव्हीएम सुविधा, ६ स्थानकांवर २०६ सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, भिवंडी रोड-नावडे रोड येथील २नवीन बुकिंग ऑफिसेस,सानपाडा ईएमयू कारशेड येथे १ मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प या विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पणही करण्यात आले.
सीवूड्ड्स/नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या माध्यमातून सिडकोतर्फे २८९६ कोटी रूपये खर्च करून सीवूड्ड्स ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुलभरित्या जोडणारे इंटीग्रेटड नेटवर्क विकसित करण्यात येत आहे. सध्याचे पनवेल स्थानक हे भविष्यात मुंबई महानगराशी जोडणारा महत्वाचा दुवा सिद्ध होणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीड्डस / नेरूळ-उरण रेल्वे मार्ग टप्पा -१ च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. सदर उद्घाटन समारंभ ११ नोव्हेंबर रोजी खारकोपर रेल्वे स्थानक, उलवे येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली हिरवे झेंडे दाखवून संपन्न झाला.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री अनंत गीते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खा. अरविंद सावंत, खा. श्रीरंग बारणे, खा. राजन विचारे, खासदार, आ.बाळाराम पाटील, आ. रमेश पाटील, आ. मनोहर भोईर, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. मंदा म्हात्रे, आ. संदिप नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा व सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा उपस्थित होते. त्याचप्रमाणे सिडको महामंडळातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मुंबई शहरापेक्षाही मोठ्या क्षेत्रफळाच्या नैना प्रकल्पाच्या विकासासाठी ‘मोबिलीटी इंटीग्रेटेड’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. सिडकोतर्फे रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जात असून त्यात रेल्वे, मेट्रो, रस्ते, जल वाहतूक या परिवहन माध्यमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांच्या सभोवतालच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी ४० हजार घरे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १ लाख घरे बांधण्याचा सिडकोचा संकल्प आहे. त्यायोगे नागरिकांना कमीत कमी वेळात कामाच्या ठिकाणी प्रवास करणे सुलभरित्या शक्य होईल, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
सीवूडस/नेरूळ – उरण रेल्वेच्या प्रथम टप्प्याच्या कार्यान्वयनामुळे या परिसरातील लोकांची प्रतिक्षा संपली आहे. याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा देखील लवकरात लवकर कार्यान्वित केला जाईल असा विश्वास पियुष गोयल यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला गती प्राप्त झाल्याबद्दल प्रशांत ठाकूर यांनी या प्रसंगी त्यांचे आभार व्यक्त केले. या प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे असे मत प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
कोणत्याही शहराचा, राज्याचा किंवा देशाचा आर्थिक विकास हा त्या ठिकाणच्या पायाभूत सोयी सुविधांच्या विकासावर अवलंबून असतो. हा प्रकल्प नवी मुंबईच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्याचबरोबर उलवे, द्रोणागिरी, उरण या भागात राहणारे सर्व सामान्य लोकांना या प्रकल्पाद्वारे चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. असे मत लोकेश चंद्र यांनी व्यक्त केले.
मुंबई उपनगरीय रेल्वेचा एक भाग असणारा सीवूड्स/नेरूळ-उरण रेल्वे मार्ग हा सिडको आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास येत असून, पहिल्या टप्प्यात या मार्गावरील पहिली ५ स्थानके विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एकूण २७ कि.मी. लांबी व १० रेल्वे स्थानके असलेला हा मार्ग दोन टप्प्यांमध्ये विकसित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित ५ रेल्वे स्थानकांपैकी २ स्थानकांचे काम पूर्णहोऊन सदर स्थानके कार्यान्वित झाली आहेत. पहिला टप्पा हा १२ कि.मी. लांबीचा असून तो उलवे, बेलापूर व नेरूळ नोडसना जोडेल. पहिल्या टप्प्यातील उर्वरित विकसित होणारी स्थानके : सीवूडस, सागरसंगम, तरघर.
सदर प्रकल्पामध्ये सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यातर्फे करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीचे गुणोत्तर अनुक्रमे ६७:३३ असे आहे. सदर रेल्वे मार्गामुळे उलवे तसेच नवी मुंबईच्या दक्षिण भागातील दूरवरच्या नोड्समधील नागरिकांना उपनगरीय रेल्वे सेवेचा लाभ होणार असून त्यायोगे या परिसराच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
महत्त्वाचे मुद्देः-
नेरूळ ते खारकोपर मार्गावर उद्या सोमवार दि. १२ पासून नियमित सेवा सुरू होणार.
नेरूळ-खारकोपर-नेरूळ आणि बेलापूर-खारकोपर-बेलापूर अशा अप व डाऊन मिळून २०-२० फेऱ्या दररोज होणार आहेत.
नेरूळपासून निघणारी ट्रेन सीवूडस-दारावे, बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांवर थांबेल,
तसेच बेलापूर येथून निघालेली ट्रेन बामणडोंगरी, खारकोपर या मार्गे जाईल.
०००००
नेरुळ सीवूडस/बेलापूर- उरण रेल्वे मार्ग वैशिष्ट्ये
दक्षिण नवी मुंबई चा विकास जलद होण्यासाठी हा मार्ग सिडको ने विकसित केला
या दुहेरी रेल्वेमार्गाची लांबी २७ किमी
प्रकल्प खर्च सिडको ६७ % व मध्य रेल्वे ३३%
टप्पा १- सीवूडस ते खारकोपर आणि बेलापूर ते सागर संगम(१२किमी)
टप्पा २- खारकोपर-गव्हाण-रांजणपाडा- न्हावाशेवा-द्रोणागिरी-उरण (१५किमी)
एकूण स्थानके १०
पहिल्या टप्प्यात ५ तर दुसऱ्या टप्प्यात ५ स्थानकांची निर्मिती
दुहेरी बाजूनी चढता उतरता येणाऱ्या २७० मी लांबीचे प्लॅटफॉर्म
४ रोड ओव्हर ब्रीज
१५ पुलाखालील रस्ते
४ मोठे पूल
७८ लहान पूल
१ पुला खालील रेल्वेमार्ग
दुसरा टप्पा डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार
००००००००००००००००००००० ००००००००००००००००००००० ००००००००००००००००००००००० ०००००००००