स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गटारावरील झाकणांची दुरूस्ती न झाल्यास येणाऱ्या प्रभाग समितीच्या बैठकीत सभागृहामध्ये जमिनीवर बसूनच कामकाजात सहभागी होण्याचा इशारा ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाला दिला आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात अनेक गटारांवरची झाकणे तुटलेली आहेत. या गटारासभोवताली असणाऱ्या पदपथावरून ये-जा करताना ग्रामस्थांच्या तसेच स्थानिक रहीवाशांच्या पायाला रात्रीच्या अंधारात जखमा झालेल्या आहेत. याविषयी गणेशोत्सवापूर्वीच्या प्रभाग समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करून मनोज मेहेर यांनी समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मनोज मेहेर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून गटारावरील तुटलेली झाकणे दाखवून देण्याच्या घटनेला तीन महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. या गटारांवरील तुटलेली झाकणे दुरस्त न झाल्यास येणाऱ्या प्रभाग समितीच्या प्रत्येक बैठकीमध्ये आपण सभागृहात जमिनीवर बसूनच कामकाजात सहभागी होणार असल्याचा इशारा मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
सारसोळे ग्रामस्थांच्या तसेच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व महापालिकेचा अकार्यक्षमपणा नवी मुंबईकरांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण हे लोकशाहीतील महत्वाचे आयुध वापरणार असल्याची माहिती मनोज मेहेर यांनी यावेळी दिली.