नवी मुंबई : स्वच्छता ही नागरिकांची नियमित सवय व्हावी व दैनंदिन वापरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी जागरून व्हावे याकरीता महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिेकेने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. यादृष्टीने विविध विभागांत स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.
या मोहिमांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असावा याकरीता विभाग कार्यालयांमार्फत प्रयत्न केले जात असून अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहिम नेरुळ विभागात राबविण्यात आली. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एस.बी.आय कॉलनीमधील सफाई कामगारांचा परिसरामध्ये चांगले काम करण्याबाबत सत्कार करण्यात आला तसेच नेरुळ परिसरामधे सार्वजनिक शौचालय सफाईची विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याप्रसंगी परिसरामधील नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अनुषंगाने ओला कचरा व सुका कचरा नेहमी वर्गीकरण करण्याविषयी जागरूक रहावे तसेच प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करणे याविषयी प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेमध्ये नेरुळ विभागाच्या स्वच्छता निरीक्षक श्रीम. जयश्री अढाळ, उप स्वच्छता निरीक्षक श्री. अजित तांडेल, श्री. विरेंद्र पवार, स्वच्छाग्रही व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
वाशी विभागात अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
वाशी विभाग कार्यक्षेत्रामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणा–या व्यावसायिकांवर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा–या व्यावसायिकांकडून 60 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येऊन विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके यांच्या नियंत्रणाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे 20 हजरा 250 रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे, स्वच्छता अधिकारी श्री. सुधिर पोटफोडे, स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात,उप स्वच्छता निरीक्षक श्रीम. सुषमा देवधर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दिघा विभागातही शौचालय स्वच्छता व दुरुस्ती मोहिम
दिघा विभाग कार्यक्षेत्रामधील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची विशेष स्वच्छता मोहिम राबवून किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये शौचालयांची साफसफाई करण्यात येऊन त्यांचे दरवाजे, कडी कोयंडे, खिडक्या अशी किरकोळ दुरूस्ती करण्यात आली. या मोहिमेमध्ये विभागातील स्वच्छता अधिकारी श्री. सतीश सनदी, स्वच्छता निरीक्षक श्री. राजु बोरकर, उप स्वच्छता निरीक्षक श्री. तेजस ताटे, स्वच्छाग्रही व परिसरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.