- राज्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा बोजवाराः सचिन सावंत
- ९१ टक्के युवकांना प्रत्येकी फक्त २३ हजारांचे कर्ज
मुंबई : भाजप सरकाने मोठा गाजावाजा केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही बोजवारा उडाला असून गेली चार वर्ष वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून सरकारतर्फे चालत असलेल्या जनतेच्या फसवणुकीचा पुढचा अध्याय ही योजना ठरली आहे. मुद्रा योजनेच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार युवकांची घोर फसवणूक सरकारने केली आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजप व सरकारतर्फे मुद्रा योजना किती यशस्वी ठरली आहे याचा पाढा सातत्याने वाचला जात आहे. राज्य सरकारतर्फे जाहीर केलेल्या आकड़ेवारीनुसार १ कोटी १९ लाख तरूणांना एकूण ५९ हजार ७४६ कोटी रूपयांचे कर्ज या योजने अंतर्गत वाटण्यात आले आहे. मुद्रा योजने अंतर्गत ‘शिशु’ वर्गासाठी ५० हजार रूपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ‘किशोर’ वर्गात ५० हजार ते ५ लाख रूपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तरूण या वर्गात ५ लाख ते १० लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. वस्तुस्थिती ही आहे की, ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत म्हणजेच सरकारने चार वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत मुद्रा योजनेच्या वेबसाईटवर असलेल्या आकडेवारीनुसार सरकारने जाहीर केलेल्या आकड्यापेक्षा अधिक म्हणजेच १ कोटी २३ लाख ३६ हजार ९१७ जणांना कर्जाचे वाटप झाले आहे. परंतु यामध्ये एकूण १ कोटी १२ लाख ७ हजार २५८ जणांना म्हणजेच एकूण ९०.८४ टक्के लोकांना शिशु या वर्गातच कर्ज दिले गेले आहे. ज्याची रक्कम सरासरी २३ हजार ३० रूपये आहे. एवढ्याशा रकमेत चहाची टपरी किंवा पकोडा तळण्याचा उद्योगही उभा राहू शकत नाही.
तसेच केवळ ७. १७ टक्के लोकांना सरासरी २ लाख १० हजार ७३६ रूपये कर्ज मिळाले आहे. दोन लाख रूपयातही कोणता उद्योग उभा करू शकतो याचे मार्गदर्शन सरकारने बेरोजगार तरूणांना करावे असा टोला सावंत यांनी लगावला. सरकार दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तरूणांना रोजगार देण्याऐवजी मोठमोठ्या घोषणा, फसव्या जाहिराती, अतिरंजीत व खोटे आकडे दाखवून त्यांची दिशाभूल करत आहे असे सावंत म्हणाले.