सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असणाऱ्या ज्वेल ऑफ नवी मुंबईला विविध समस्यांचा विळखा पडला असून या बकालपणाच्या विळख्यातून ज्वेल ऑफ नवी मुंबईला मुक्त करण्याची लेखी मागणी समाजसेवक रवींद्र भगत यांनी महापािलका आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईच्या गौरवशाली परंपरेला भूषणावह अशी कामे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली असून त्यात ज्वेल ऑफ नवी मुंबईचे स्थान निश्चितच अग्रस्थानी आहे. परंतु या परिसरात सध्या विविध समस्यांनी थैमान घातले असून पालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे या परिसराला बकालपणा प्राप्त झाला आहे आणि ही बाब या प्रगतशील शहराला भूषणावह नाही. ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात पथदिवे तुटलेल्या व नादुरूस्त अवस्थेत पहावयास मिळत आहेत. या परिसराची आपण पाहणी केल्यास जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला आपणास तब्बल १२ ते १५ पथदिवे तुटलेल्या अवस्थेत तसेच विद्युत केबल्स उघड्या अवस्थेत विखुरलेल्या पहावयास मिळतील. त्यामुळे या ठिकाणी पहाटे तसेच रात्री व्यायाम करण्यासाठी अथवा फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नवी मुंबईकरांना अंधारातच वावरावे लागते. अनेक पथदिव्यांचे डीपी बॉक्स तुटलेले असून त्या नादुरूस्त पथदिव्याच्या जागी नवीन पथदिवे तात्काळ महापालिका प्रशासनाने बसविणे आवश्यक आहे. या उघड्या विद्युत केबल्सला ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान बालकांचा स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना होवून जिवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या उघड्या विद्युत केबल्स भूमिगत करणे आवश्यक आहे.ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरातील झाडे आज मृतावस्थेत पहावयास मिळत असून नव्याने रोपण केलेली वृक्ष आज पाणी आणि देखभालीअभावी सुकलेली आहेत. या वृक्षाभोवती माती टाकण्यात आलेली आहे. एकीकडे मातीचा अभाव, दुसरीकडे पाणी नाही, देखभाल केली जात नाही. पाण्याअभावी येथील झाडे सुकली असून पानेही गळून पडली आहेत. झाडांच्या बुंध्यापाशी दगडधोंड्यांचा खच पडलेला आहे. यामुळे येथील झाडे अखेरच्या घटका मोजताना पहावयास मिळतात.ज्वेल ऑफ नवी मुंबईला आज महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बकालपणा आलेला आहे. समस्या न सुटल्याने येथे येणारे रहीवाशी पालिका प्रशासनाप्रती उघडपणे रोष व्यक्त करत आहे. समस्या गंभीर होत असून ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या नावलौकीकाला व सौंदर्याला ग्रहण लागले. येथील समस्या शक्य तितक्या लवकर सोडविण्याचे आपण संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी समाजसेवक रवींद्र भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.