सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून परिचित असणार्या व राज्य तसेच केंद्र सरकारकडून सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होणार्या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे मूषक नियत्रंण विभागात काम करणार्या कामगारांना दिवाळीचा बोनस व दोन महिन्याचे वेतन देण्यास विलंब झाल्याचे उघडकीस आले आहे.
पालिका प्रशासनात काम करणार्या मूषक नियत्रंण विभागातील कंत्राटी कामगारांची वेतन विलंबामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने ससेहोलपट होत आहे. या कामगारांना २४ तास काम करावे लागत असून पालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदारांकडून कोणत्याही विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. गेल्या काही वर्षात या कामगारांना गणवेशही मिळालेला नाही. रात्री-अपरात्री फिरण्यासाठी विजेरी (टॉर्च) व उंदिर मारण्यासाठी लागणारीही काठीदेखील कामगारांना आपल्याच खर्चातून घ्यावी लागत आहे. पालिका प्रशासन व ठेकेदार मूषक कामगारांना साधे ग्लोव्हजही उपलब्ध करून देत नसल्याने उंदिर मारण्यासाठी गोळ्या टाकणे, मेलेले उंदिर जमा करणे ही कामे मूषक नियत्रंक कामगार हातानेच करत असल्याने ते सतत आजारी पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नोव्हेंबर महिना संपत आला तरी मूषक नियत्रंण विभागातील कामगारांना अजून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही. दिवाळीचा बोनसही या कामगारांना देण्यात आलेला नाही. या कामगारांनी वेतनाबाबत विचारणा केल्यास प्रशासन व ठेकेदार दोघांकडे टोलवाटोलवी करत आहे. वेतनाबाबत विचारणा करावयास झाल्यास ठेकेदार व पालिका प्रशासनातील डॉ. झुंजारे फोनही उचलत नसल्याचा संताप या मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून व्यक्त केला जात आहे.