सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट मंगळवारपासून बंद असले तरी घरातील गृहीणींना व हॉटेलव्यावसायिकांना दोन दिवस बंद असलेल्या मार्केट बंदचा कोणताही प्रभाव पडल्याचे पहावयास मिळाले नाही. मार्केट बंद असतानाही भाज्या उपलब्ध होत असल्यामुळे मार्केट लवकरात लवकर सुरू करण्याशिवाय माथाडी व व्यापार्यांसमोर पर्याय राहीला नसल्याचे बाजार आवारात बोलले जात आहे.
कृषी मालाच्या थेट विक्रीस परवानगी मिळाल्यामुळे पुणे, नगर, नाशिक, सोलापुर भागातील टेम्पो, महिंद्रा पिकअपमधून भाज्या नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई व मुंबईच्या उपनगरात विक्रीला येत आहेत. नवी मुंबईतही बेलापुर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, जुहूगाव, कोपरखैराणे, ऐरोलीतही टेम्पो अथवा महिंद्रा पिकअप वाहनातून भाज्या विक्रीला येत आहेत. पामबीच मार्गावर सकाळी फिरावयास येणार्यांना दररोज ताज्या भाज्या टेम्पोतून विकत मिळत असल्याने त्यांच्यावरही मार्केट बंदचा फारसा फर पडणार नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
पनवेल व दादर मार्केटमध्ये भाज्या मिळत असल्याने किरकोळ व्यापारी त्या ठिकाणाहून भाज्या आणत असल्याने भाज्याचे स्टॉल्स लागल्याचे पहावयास मिळत आहे. दररोजच्या तुलनेत भाज्या थोड्या महाग दरात विकल्या जात असल्या तरी मार्केट बंदचा प्रभाव न पडल्याने आता या बंदमुळे नक्की नुकसान कोणाचे होत आहे, तेच समजत नसल्याची नाराजी एपीएमसीतील व्यापारी व्यक्त करू लागले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनीही दोन दिवसाचा भाज्यांचा साठा करून ठेवला आहे. त्यांना भाज्या पुरविणार्या ठेकेदारांनी दादर व पनवेल मार्केटमधून भाज्या पुरविल्याने हॉटेल व्यवसायावरही कोणताही प्रभाव मार्केट बंदचा दिसून आला नाही.