‘परिवर्तन होणार, नगर बदलणार’ भाजपची टॅगलाईन चर्चेत
सुवर्णा खांडगेपाटील
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत यंदा अहमदनगर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याच्या त्वेषाने उतरलेल्या भाजपने प्रचाराच्या काटेकोर नियोजनासाठी वॉररूम तयार केली आहे. महापालिकेच्या प्रचारात उतरणार्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचे आणि रोड शोजचे नियोजन करण्याबरोबरच विविध टप्प्यात प्रचाराची दिशा ठरवण्याचे काम या वॉररूममार्फत करण्यात येणार आहे. या शिवाय पारंपरिक प्रचारासोबतच होर्डिंग कॅम्पेन, फेसबुक, वॉट्सऍप आणि ट्वीटरसारख्या ऍप्सच्या माध्यमातून सोशल मिडियावरील हायटेक प्रचाराचेही नियोजन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबई येथे एकिकडे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची धामधूम असतानाच नगर महापालिकेचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात आघाडी घेत भाजपने महापालिका प्रचाराचे सुयोग्य नियोजन केले आहे. प्रचारादरम्यान दर दिवशी राज्य पात्ळीवरील किमान एका बड्या नेत्यांची हजेरी अहमदनगर शहरात राहावी यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. याशिवाय विरोधकांकडून होणार्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीची यंत्रणाही उभारली जात आहे. तसेच प्रभागनिहाय रोड शो आणि रॅलीजचे वेळापत्रकही ठरवले जात आहे. हे करत असतानाच मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवरही भाजपने लक्ष दिले असून पक्षाचे स्थानिक पदाधिकारी घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार करत आहेत.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत बेकायदा ऑनलाईन प्रचाराला आळा घालण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पोलीसांना दिले आहेत. त्या अनुषंगाने वॉटस् अप् ग्रुप, फेसबुक, यु ट्यूब आणि ट्विटरसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर पोलीसांच्या सायबर क्राईमचा वॉच असणार आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील प्रचारासाठी आवश्यक असलेल्या योग्य त्या कायदेशीर परवानग्या मिळवून ऑनलाईन प्रचाराचा आराखडाही भाजपच्या वतीने तयार केला जात आहे. एकूणच प्रचाराची सगळी यंत्रणा भाजपने कामाला लावली असून सोबतच विरोधकांच्या हालचालींवरही नजर ठेवली जात आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकवायचाच या त्वेषाने भाजपने कंबर कसली आहे.
* भाजपचे होर्डिंग कॅम्पेनही ठरतेय नगरकरांच्या चर्चेचा विषय
नगर शहराचे प्रमुख चौक, महत्वाचे रस्ते तसेच मोक्याच्या ठिकाणी आपले होर्डिंग लावत भाजपने प्रचाराच्या प्रभावी माध्यमाचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. ‘परिवर्तन होणार, नगर बदलणार’ ही टॅगलाईन असलेले हे होर्डिंग कॅम्पेन नगरकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. पायभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, जेष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच खेळाला प्रोत्साहन अशा विविध मुद्यांवर भाजपची भुमिका स्पष्ट करणार्या या होर्डिंग्जमुळे शहरातील वातावरण संपुर्ण भाजपमय झाले आहे.