अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले स्पष्ट
मुंबई : म्हाडाच्या सोडतीसाठी असलेल्या घरांच्या किंमती कमी होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. म्हाडाच्या २०१८ च्या घरसोडतीच्या नोंदणीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत किमती कमी होणार नसल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुंबई मंडळ सभापती मधु चव्हाण यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मागणी केली होती. पण आता किमती कमी होऊ शकत नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले. पुढच्या घरसोडतीत किमती कमी करण्याच्या विषयाबाबत प्राधिकरणाची बैठक घेणार आहोत, असल्याचे त्यांनी माहिती दिली.
मागच्या सोडतीच्या तुलनेत घरांच्या किंमती कमी केल्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे. अजून १० दिवस सोडतीसाठी बाकी आहेत. यादरम्यान १ लाखांपर्यत अर्ज येण्याचा अंदाज आहे. आतापर्यत अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्य गटाचे मिळून १ हजार ३८४ घरांसाठी ७८ हजार २७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. २०१७ मध्ये ६५ हजार १२६ अर्ज प्राप्त झाले होते.
अलिशान व मोक्याच्या ठिकाणी घर खरेदी करण्यासाठी ७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. कंबाला हिल येथील घरांनाही चांगला प्रतिसाद आहे. ५ कोटी १३ लाखांच्या घराला २८ जणांनी अर्ज केले आहेत. तर ४ कोटी ९९ लाखांच्या घराला २५ जणांनी अर्ज केले आहेत. ५ कोटी ८० लाखांचे घर खरेदी करण्यासाठी २६ जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे महागड्या घरांना नागरिक प्रतिसाद देत आहेत, हे आताच्या संख्येवरुन कळत आहे.
- माहुलवासियांना मिळणार पर्यायी घरे –
माहुलवासियांचा विचार करता म्हाडा त्यांना मदत करण्यासाठी म्हाडाने प्रस्ताव ठेवला आहे. संक्रमण शिबिरामधील ५५० घरांमधील ३५० घरे म्हाडा माहुलवासीयांना राहण्यासाठी देणार आहे. बोरीवली, गोराई, पवई या भागात ही घरे असणार आहेत. ही घरे कायमस्वरुपी नसून रहिवाशांची पर्यायी होईपर्यंत त्यांना घरे देणार आहेत. ही पर्यायी घरे म्हाडाकडून पालिकेला देणार आहोत. त्यांच्या माध्यमातून ही घरे माहुलवासीयांना देण्यात येणार आहेत. - पलावावाल्यांनी जीएसटी भरू नका
पलावा सिटीमधील घरांना विकासकांनी जीएसटी भरण्याचे पत्र दिले होते. त्यांची तक्रार रहिवाशांनी म्हाडाला केली होती. याची दखल घेत जीएसटी भरण्याची गरज नाही, असे आदेश म्हाडाने दिले आहेत. काही व्यक्ती लॉटरीचे घर मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करतात. फसवणूक करणाऱ्या लोकांची तक्रार ०२२-२६६४०५४४५या क्रमांकावर करण्याचे आवाहन उदय सामंत यांनी केले.