नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील विविध नागरी सुविधा कामांचे स्थायी समिती सभेपुढे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास सभापती श्री. सुरेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची मान्यता लाभलेली आहे.
यामध्ये नेरुळ विभागातील से.3 व 15 भागातील रस्त्यांवर काही ठिकाणी नागरी सेवा पुरविणाऱ्या विविध संस्थांमार्फत खोदकाम करण्यात आल्याने चरा झाल्या आहेत तसेच विविध ठिकाणी पृष्ठभाग खराब झालेला आहे. अशा दूरवस्था झालेल्या रस्त्यांमुळे तेथील रहदारीस व वाहतुकीस होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने तेथील अंतर्गत रस्त्यांची डांबरीकरणाने सुधारणा करण्याच्या साधारणत: रू. 51 लक्ष 39 हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झाली आहे.
अशाच प्रकारे से.23 जुईनगर व जुईपाडा अंतर्गत भागातील गटार अरुंद व ठिकठिकाणी तुटलेले असल्यामुळे पावसाळी कालावधीत गटारातील पाणी रस्त्यावर येऊन साचून राहते तसेच गटारातील पाण्याचा निचराही व्यवस्थित होत नाही. याकरीता सदर गटारे सुधारणा करणे या भागातील ठिकठिकाणी नादुरुस्त असलेला रस्ता ठिक करुन नागरिकांच्या दळणवळणास होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने जुईनगर से.23 व जुईपाडा गाव अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे आणि उर्वरित गटर व पदपथाची सुधारणा करणे अशा साधारणत: रू. 2 कोटी 50 लाख 83 हजार रक्कमेच्या सुविधा कामास स्थायी समितीची मान्यता प्राप्त झालेली आहे.
त्याचप्रमाणे तुर्भे विभागातील बोनसरी येथे नालंदा बुध्दविहार ते दुर्गा माता मंदिर पर्यंतच्या रस्त्याचा पृष्ठभाग अत्यंत खराब झाल्याने तसेच तेथील ड्रेनची दूरवस्था झाल्याने याठिकाणी रस्ता सुधारणा व गटार बांधण्याच्या साधारणत: 29 लक्ष 91 हजार रक्कमेच्या कामास मंजूरी लाभलेली आहे.
तसेच तुर्भे विभागातील से.22 येथील गुप्ता वजन काटा, ॲपेटाईट हॉटेलजवळील चौक ते अशोक सहकारी संस्था या मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणावर अवजड वाहनांची कायम वर्दळ असल्याने सध्याचा डांबरी रस्ता मोठया प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे वाहतूकीला होणारी अडचण लक्षात घेऊन 7726 चौ.मी. क्षेत्रफळापैकी 4257.50 चौ.मी. क्षेत्रफळाच्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे व 3469 चौ.मी. क्षेत्रफळाच्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्याच्या साधारणत: रु.3 कोटी 67 लक्ष 8 हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीची मान्यता मिळालेली आहे.
पावणे ब्रिजजवळ ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांची मोठया प्रमाणावर रहदारी असते. त्याठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी पदपथ नसल्याने रस्त्यावरुन नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे वर्दळीच्या वेळी वाहनांची कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता भासते. या गोष्टी विचारात घेऊन रस्त्यालगत पदपथ बांधणे व आलोक नाल्यावर फुटब्रिज बांधणे आवश्यक आहे. ज्यामुळे नागरिक पदपथ व फुटब्रिजचा वापर करतील व रस्त्यावरुन चालणार नाहीत. त्यामुळे अपघाताचा संभाव्य धोकाही टळेल. याबरोबरच पावसाळयात तेथील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी व रस्त्यावर पाणी साचू नये यादृष्टीने रस्त्याच्या बाजूने पावसाळी ड्रेन बांधणेही आवश्यक आहे. अशा प्रकारे ठाणे-बेलापूर रस्त्यालगत पावणे ब्रिज जवळ आलोक नाल्यावर फुटब्रिज बांधणे व रस्त्यालगत फुटपाथ व गटर बांधणेच्या साधारणत: रु.1 कोटी 66 लक्ष 23 हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीची मंजूरी मिळालेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र इको सिटी म्हणून विकसीत करण्याच्या दृष्टीने पर्यावरणशील वॉकॅबिलीटी संकल्पनेला व नागरिकांनी प्रदूषण विरहीत सायकल वाहनाचा जास्तीत जास्त वापर करावा या गोष्टीला प्राधान्य देण्यात येत आहे. या अनुषंगाने से.21 तुर्भे येथील उड्डाणपूल ते अन्नपूर्णा चौक या वाशी-तुर्भे लिंक रस्त्यालगतच्या पदपथाचा सायकल ट्रॅकसह पूनर्विकास करणे कामाच्या साधारणत: रु.77 लक्ष 13 हजार रक्कमेच्या सुविधा कामास मंजूरी लाभलेली आहे. यामध्ये 911.50 चौ.मी. क्षेत्रफळाच्या पदपथाचा पूनर्विकास, 735 चौ.मी. क्षेत्रफळाचा सायकल ट्रॅक तयार करणे आणि हिरवेगार लॉन व शोभिवंत झाडे लावून आसन व्यवस्थेसह पदपथाची सुधारणा करणे तसेच त्या ठिकाणी असलेल्या जुन्या दूरवस्था झालेल्या जुन्या दगडी बांधकामाच्या ड्रेनमधून पावसाळी पाण्याचा निचरा होत नसल्याने 95 मी. लांबीची आर.सी.सी ड्रेन बांधणे कामे करण्यात येणार आहेत.
अशा विविध नागरी सुविधा कामांना स्थायी समितीची मंजूरी लाभली असून याव्दारे नागरिकांना चांगल्या सूविधा उपलब्ध् होऊन गैरसोय दूर होणार आहे.