सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : २७ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात सुरू झालेल्या गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचे नवी मुंबई महानगरपालिकेने अगदी सुरूवातीपासूनच व्यवस्थित नियोजन केले असून आत्तापर्यंत ५ दिवसात ७५ शाळांमधील इयत्ता दहावीपर्यंतच्या ९० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
सर्व शाळांमध्ये ८० टक्केपेक्षा जास्त लसीकरण झाले असून विशेषत्वाने फादर ॲग्नेल स्कुल वाशी येथे ९७%, डॉन बॉस्को स्कुल से. ४२ नेरुळ येथे ९५%, साई होली फेथ हायस्कुल कोपरखैरणे येथे ९९% श्रीराम विद्यालय प्रायमरी मराठी, सेकंडरी मराठी आणि सेकंडरी इंग्लिश स्कुल ऐरोली याठिकाणी अनुक्रमे ९७%, ९८% व ९७% तसेच विबग्योर इंटरनॅशनल स्कुल ऐरोली येथे ९५%, सेंट मेरी हायस्कुल वाशी येथे ९५%, आणि शिरवणे विद्यालय माध्यमिक शाळेत ९९ % इतके लसीकरण झाले आहे.
यामध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. महावीर पेंढारी यांच्या डॉन बॉस्को सिनीअर सेंकडरी स्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिकणा-या कु. मृदुल महावीर पेंढारी या मुलास तो लसीकरणाच्या दिवशी शाळेत उपस्थित नसल्याने आज नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, करावे येथे लसीकरण करुन घेण्यात आले.
९ महिने ते १५ वर्षाआतील प्रत्येक मुलाला गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षण मिळवून देण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे असून कु. मृदूल पेंढारी प्रमाणेच शाळांमध्ये लसीकरणाच्या दिवशी अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे व आपल्या पाल्यांना गोवर व रूबेला या आजारांपासून संरक्षित करावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.