नवी मुंबई : नवी मुंबईकरांना सातत्याने सहन करावा लागणारा डासांचा त्रास, वारंवार धुरफवारणी करूनही डासावर प्रभाव नाही, आरोग्य विभागातील दवाखाने, रूग्णालयेत औषधे रूग्णांना उपलब्ध होत नाही याबाबत नवी मुंबईकरांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबाबतचा उद्रेक शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. देविदास हांडेपाटील, नामदेव भगत, डॉ. जयाजी नाथ यांच्यासह इतरांनी पालिका प्रशासनावर हल्लाबोल चढवित कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा शहरवासीयांना फटका बसत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून, ठेकेदारावर कारवाई करून नवीन निविदा काढाव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभ्यासू नगरसेवक व कोपरखैराणेतील राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ असणाऱ्या देविदास हांडेपाटलांनी यापूर्वीही स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाला धारेवर धरत पालिका प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर मांडली आहेत. ज्यावेळी महापालिका प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांना मानपत्र वितरीत होते, त्यावेळी महापालिकेत निवडून आलेल्या १११ नगरसेवकांपैकी देविदास हांडेपाटील यांनीच ते मानपत्र स्वीकारण्यास जाहीररित्या नकार देत स्वाभिमानी बाणा दाखवून दिला होता. माझ्या प्रभागातील कामे प्रशासनाकडून होत नसतील, समस्यांना न्याय मिळत नसेल तर ते मानपत्र स्वीकारण्यात मला काहीही स्वारस्य नसल्याचा रोखठोक पवित्रा देविदास हांडेपाटील यांनी घेतलेला आजही नवी मुंबईकर विसरलेले नाहीत.
शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत औषध विषयावरून देविदास हांडेपाटील यांनी आक्रमक होत पालिका प्रशासनावर सुरूवातीपासूनच हल्लाबोल चढविला.औषध वितरण प्रणालीवर संशय व्यक्त करत देविदास हांडेपाटील यांनी औषध पुरवठ्यात काळाबाजार सुरु असल्याचा गंभीर आरोपही केला. औषध देण्यात अकार्यक्षम ठरत असतानाही त्याच ठेकेदाराला पुन्हा का मुदतवाढ दिली जात आहे, असा संतापही हांडेपाटील यांनी व्यक्त केला. डास नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची गुणवत्ता कोठे तपासली जाते. औषधांऐवजी डिझेलचा धूर केला जात असण्याची शक्यता असून याची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी हांडेपाटील यांनी यावेळी केली.
महापालिका मलेरिया व डेंग्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याशिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करणाºया ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. ठेका रद्द करून नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांनी या विषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हिवाळ्यात प्रत्येक वर्षी डासांचे प्रमाण वाढत असते. पालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी डासांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती दिली. औषधे खरेदीची जबाबदारी ठेकेदारावर का देण्यात आली व या विषयीची माहिती पुढील सभेत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.