महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून दिला आहे.
देवांना आणि नेत्यांनाही त्यांचे भगतगण अडचणीत आणीत असतात. वर नरेंद्र व खाली देवेंद्र यांच्या बाबतीत हेच घडताना दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास भगतगण मंत्रिमहोदय गिरीश महाजन यांनी अशी पंचारती ओवाळली आहे की जगातील सर्व जंतरमंतर, जादूटोणावाले भूमिगत झाले आहेत. अडचणींमधून मार्ग काढण्याची मुख्यमंत्र्यांना ‘दैवी’ शक्ती प्राप्त झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. दैवी शक्तीच्या आधारे मुख्यमंत्री कारभार करीत असून विधानसभा, कॅबिनेट वगैरे सर्व बिनकामाचे आहे, हा त्याचा दुसरा अर्थ होतो. भाजपच्या एका प्रवक्त्याने मागे नरेंद्र मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे जाहीर करून खुशामतखोरीचे शिखर गाठले होते. आता देवेंद्र महाराजांना मखरात बसवून त्यांची आरती सुरू झाली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठय़ांना 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिमतीने घेतला. (त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे.) त्यास सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने पाठिंबा दिला. मुळात ज्या प्रकारचा सामाजिक, राजकीय दबाव राज्यात मराठा समाजाने निर्माण केला होता तो पाहता त्यांना ‘आरक्षण’ नाकारणे किंवा खोळंबून ठेवणे ब्रह्मदेवालाही शक्य नव्हते. फडणवीस यांच्या जागी इतर कोणी असते तरीही त्यांना ते करावेच लागले असते. हा निर्णय सरकारचा, संपूर्ण मंत्रिमंडळाचा होता. त्यामुळे महाजन यांनी जे दैवी अवताराचे भाष्य केले ते हास्यास्पद ठरते. फडणवीस हे देव असतील तर समस्त विरोधी पक्ष हा देवादिकांचे वाहनआहे. जसे नंदी हे शंकराचे, उंदीर हे श्री गजाननाचे वाहन आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
दैवी शक्तीचा संचार हा फक्त सत्तेवर असतानाच का होतो? एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते व त्यानंतर महाराष्ट्राचे प्रमुख मंत्री असताना तेदेखील अंगात संचारल्यासारखेच वागत-बोलत असत, पण फडणवीस यांनी खडसे यांची ‘पॉवर’ काढून घेताच त्यांच्यातील दैवी संचारही संपला व ते आता मुक्ताईनगरात वाती वळत बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘पॉवरबाज’ आशीर्वादाचा हात गिरीश महाजन यांच्या खांद्यावर ठेवल्याने त्यांनाही आज संचारल्यासारखे वाटत असावे, पण 2019 च्या आधी महाराष्ट्राची ‘पॉवर कट’ होऊ शकते आणि या भारनियमनाची सुरुवात आता झाली आहे असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील महानगरपालिकांचे निकाल भाजपच्या बाजूने लावून घेतले हा दैवी चमत्कार नसून सत्ता व पैशांचाच खेळ आहे हे गिरीशभाऊंइतके दुसरे कोणाला समजणार? निवडणुका जिंकणे व इतर काही किडुकमिडुक कामात ‘यश’ विकत घेणे हा दैवी चमत्कार नसून भ्रष्टाचार आहे व त्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची आर्थिक अवस्था साफ ढासळली आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी हवालदिल आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची गिधाडे फडफडत असून शेकडो गावांत चारापाण्याचे संकट निर्माण झाले. या वर्षी पावसाने पाठ फिरवली. मग मुख्यमंत्र्यांना दैवी चमत्कार घडवून पाऊस पाडण्याचा प्रश्न सोडवता येईल काय? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
पण राज्यातील देवस्थानांच्या पेटय़ा फोडून सरकार चालवायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिर्डी संस्थानने रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करायला सरकारला 500 कोटी रुपये दिले. जनतेचा पैसा देवाच्या तिजोरीत जातो व हा पैसा आता सरकार चालविण्यासाठी वापरला जातो. हासुद्धा एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल! दैव देते आणि कर्म नेते असा काहीसा प्रकार केंद्रात आणि राज्यात सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
दैवाने मोदी सरकारला भरभक्कम बहुमत दिले व दैवी पुरुष नरेंद्र मोदी सिंहासनावर विराजमान झाले, पण ना कश्मीरचा प्रश्न सुटला ना अयोध्येत राममंदिर उभे राहिले. समान नागरी कायदा वगैरे तर लांबच राहिले. उलट दैवी पुरुषांच्या ‘नोटाबंदी’ चमत्कारामुळे लोकांना बेरोजगार, भुकेकंगाल होण्याची वेळ आली. महागाईने तर आकाश गाठले आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.