राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूंना रेल्वे प्रवासात टॉयलेटजवळ बसून प्रवास करावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सर्व कुस्तीपटू अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून परतत असताना हा प्रकार घडला आहे. परतत असताना सर्व कुस्तीपटूंना अनारक्षित डब्यातून प्रवास करावा लागला. पण त्यातही जागा नसल्याने अखेर शौचालयाजवळ बसून 25 तासांचा रेल्वे प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.
अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या संघात 10 महिला आणि 20 पुरुष पैलवानांचा समावेश होता. यामधील पाच पैलवानांनी पदकाची कमाईदेखील केली. मात्र इतकं करुनही रेल्वे प्रवासात त्यांच्यासाठी साधी जागाही आरक्षित नव्हती. काहींचा अपवाद वगळता इतरांना अनारक्षित डब्यातूनच प्रवास करावा लागला.
25 तासांचा हा प्रवास कुस्तीपटूंना शौचालयाजवळ बसूनच करावा लागला. प्रवासातील छायाचित्रं कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे कुस्तीपटूंवर ही दुर्दैवी वेळ आली असताना अयोध्येला गेलेली पदाधिकारी मंडळी मात्र विमानानं माघारी परतली आहेत.
महाराष्ट्रातील कुस्तीपटू रविवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास फैजाबाद येथून साकेत एक्स्प्रेसने निघाले होते. पावणे पाच वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेस मनमाडमध्ये पोहोचली. महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या खेळांडूवर अशी वेळ येणं खरंच दुर्दैवी बाब आहे.