संभाजी भिडे यांनी गुरुवारी भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी संभाजी भिडे यांनी ही भेट घेतली असून या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.’ही भेट खासगी होती’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे बुधवारी संध्याकाळपासून कोल्हापूरमध्ये आहेत. बुधवारी संध्याकाळी ते चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार होते. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे चंद्रकांत पाटील यांना संभाजी भिडे यांची भेट घेता आली नव्हती. अखेर गुरुवारी सकाळी संभाजी भिडे चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. जवळपास १५ मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘ही भेट खासगी स्वरुपाची होती’, अशी माहिती संभाजी भिडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
संभाजी भिडे आणि वाद
भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे हे आरोपी आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन समिती नेमली. संभाजी भिडे यांना या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देऊन टाकली असली तरी वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत असतात. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असे विधान केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.