भारतात सुमारे नऊ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्या याचे भारतात प्रत्यार्पण व्हावे, यासाठी लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल आज दिला जाणार असून त्यावेळी मल्या न्यायालयात हजर राहणार आहे. भारतात प्रत्यार्पण झाल्यास विजय मल्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. यासाठी कारागृहात पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं आहे.
आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली होती. विजय मल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आलं होतं. आर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. 1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे.
बराक क्रमांक 12 मध्ये तीन खोल्या असून यामधील एकामध्ये शीन बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला ठेवण्यात आलं आहे. तर तिसरा तुरुंग सध्या स्टोअर रुम म्हणून वापरला जात आहे.
विजय मल्याला ठेवण्यात येणारी जागा सामान्य कैद्यांपासून दूर असणार आहे. सामान्य कैदी आणि त्याच्यात एक मोठी सुरक्षा भिंत असणार आहे. या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरे असून, पोलिसांचा सतत पहारा असतो. कसाबच्या सुरक्षेसाठी बराक क्रमांक 12 ला आग आणि बॉम्बपासून सुरक्षित करण्यात आलं होतं. पहिल्या माळ्यावर जिथे कसाबला ठेवण्यात आलं होतं तिथे सध्या 26-11 चा हॅण्डलर अबु जिंदालला ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत अजूनही काही कैदी आहेत.
विजय मल्या हाय प्रोफाइल आहे या एकमेव कारणासाठी बराक क्रमांक 12 ची निवड करण्यात आलेली नाही, तर जवळच डॉक्टरांची सुविधा उपलब्ध असल्याने ही निव़ड करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 100 मीटर अंतरावर जेलमधील दवाखाना असून तिथे तीन डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असतात. 50 मीटर अंतरावरच अंडा सेल आहे जिथे मोठ्या गुन्हेगारांना ठेवलं जातं. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कास्कर आणि गँगस्टर अबू सालेम यांनाही एकदा येथे ठेवण्यात आलं होतं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्याला इतर कैद्यांनी तयार केलेलं जेवणच दिलं जाणार आहे. जर न्यायालयाने बाहेरुन डबा आणण्याची परवानगी दिली तरच ती सुविधा दिली जाईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर पीटर मुखर्जीला ही सोय देण्यात आली आहे.
६२ वर्षीय मल्या यास गतवर्षी एप्रिलमध्ये येथे अटक झाल्यानंतर सध्या तो जामीनावर आहे. आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला हा राजकीय हेतूने प्रेरित असून सध्या बंद पडलेली आपली किंगफिशर एअरलाईन्स चालू ठेवण्यासाठी आपण बँकांकडून कर्ज घेतले होते, असा बचाव त्याने केला आहे. मी एका कवडीचेही कर्ज घेतले नाही. ते ‘किंगफिशर’ने घेतले आहे. सचोटीने केलेल्या व्यवसायातील अपयशामुळे हा पैसा बुडाला. त्याला मी जामीन असणे म्हणजे फसवणूक ठरत नाही, असे त्याने नुकतेच ट्विटर पोस्टमध्ये म्हटले होते.
2 मार्च २०१७ला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली – लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती..