मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत. नगण्य बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्याबाबत मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री श्री. रावते यांनी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर मंत्री श्री. रावते यांनी यासाठी पाठपुरावाही केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संमत करण्यात आला.
मंत्री श्री. रावते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत होती. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ सदस्यांकडे आपण विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानंतर संबंधित विभागाकडेही याचा पाठपुरावा केला होता. आपण सुचविलेल्या उपाययोजनांची तातडीने दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात आली आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय फार महत्वाचा असून त्यामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री श्री. रावते यांनी व्यक्त केला.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री केलेल्या कांद्यासाठी २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. प्रती शेतकरी २०० क्विंटल मर्यादेपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे.