नवी मुंबई , प्रतिनिधी : नवी मुंबई सिडको क्षेत्रातील जमिनीच्या लीज होल्डचा लीज करार अर्थात भाडेपट्टा ६० वर्षांहून ९९ वर्षे केला आहे. महाराष्ट्र शासनाने फक्त ३९ वर्षे वाढवून दिलेली आहेत. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपा सरकार नवी मुंबई सिडको क्षेत्रातील जमिनी फ्री होल्ड केल्याचे सांगून नवी मुंबईकरांची दिशाभूल करीत आहे, असा टोला एमआयएमचे नेते तथा नवी मुंबई प्रभारी शाहनवाज खान यांनी लगावला आहे .
नवी मुंबई हे सिडकोने वसविले क्षेत्र आहे. सिडकोने जमिनी हस्तांतरित करून ६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर सोसायट्या तसेच इतरांना दिल्या आहेत. हा भाडेपट्टा करार संपायला अद्यापि सुमारे २० वर्षे शिल्लक असताना मध्येच भाडेपट्टा कालावधी वाढविण्यामागचा सरकारचा उद्देश काय ? असा सवाल शाहनवाज खान यांनी केला आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्यानंर नैसर्गिकरित्या भाडेपट्टा बाधणारच आहे. ९९ वर्षानंतर देखील भाडेपट्टा वाढवावा लागणार आहे. मात्र भाजपा सरकारने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे खान यांनी नमूद केले. लीज कालावधी वाढविणे म्हणजे फ्री होल्ड कसे हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्पष्ट करून द्यावे, असे देखील खान यांनी नमूद केले. महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई सिडको क्षेत्रातील जमिनी नियमाने कायमस्वरूपी फ्री होल्ड कराव्यात आणि सर्व कारभार नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी शाहनवाज खान यांनी केली आहे.