मुंबई येथील आगरी समाज सेवा संघाच्या महोत्सवात व्यक्त केले मत
पनवेल : आगरी आणि कोळी समाज माती आणि समुद्राशी नाळ जोडून आहे. तो धाडसी आहे, स्वाभिमानी आहे. लढवय्या असल्याने तो क्षत्रियच असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी व्यक्त केले.
1935 साली कॉ. जी. एल. पाटील यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील आगरी सेवा संघाच्या महोत्सवाला कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आगरी समाजाने शहरीकरणाच्या रेट्यातही पारंपरिक संस्कृती, चाली, रिती- रिवाज कालबाह्य होऊ न देता जीवाच्या पलीकडे जपले आहेत. कबड्डीसारख्या मातीतील खेळाला आपलेसे करून खिलाडूवृत्तीने त्याच्याशी नातं जोडले आहे. त्यामुळे धाडस हा गुण आगरी समाजाच्या रक्तातच असल्याने क्षत्रियांसारखे उधळत रहाणे हा स्वभावगुण बनला असल्याचे मत कडू यांनी व्यक्त केले.
आगरी समाजाच्या बोली भाषेत केवळ गोडवाच नाही तर त्या प्रत्येक शब्दात आपुलकी आणि शाश्वत प्रेम आहे. आगरी संस्कृती आणि आगरी साहित्य यांची सांगड म्हणजेच आजचा महोत्सव असल्याचे गौरदगार त्यांनी काढले.
आगरी साहित्यिक, नाटककार रामनाथ म्हात्रे, कवी सुधीर भोईर, आगरी बहुजन संघाचे अध्यक्ष निलेश पाटील यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. तत्पूर्वी काव्य स्पर्धा आणि इतर स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
व्यासपीठावर कांतीलाल कडू, अलिबागचे युवा नेते नृपाल जयंत पाटील, स्थानिक नगरसेवक सरवणकर, पद्माकर पाटील, सुभाष पाटील, नरेंद्र बांधणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.