सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- गेल्या ८ वर्षापासून नेरूळमधील आगरी-कोळी भवनात तुटपुंज्या वेतनावर सफाईचे काम करणाऱ्या १२ कामगारांचा अखेरीला संयम व सहनशीलतेचा अंत झाला आिण नववर्षाच्या सुरुवातीलाच या कामगारांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काम बंद आंदोलन करणाऱ्या कामगारांना आगरी-कोळी भवनात प्रवेश नाकारण्यात आला असून भवनाच्या आतमध्ये असणाऱ्या सुरक्षा रक्षकांकडून सफाईचे काम करवून घेतले जात आहे. याबाबत आगरी-कोळी भवनातील सिडकोच्या संबंधितांकडे विचारणा केली असता, त्यांनी ज्यांची लग्न आहेत, ते बाहेरून माणसे आणून साफसफाई करवून घेत असल्याची धडधडीत खोटी उत्तरे देण्यात आली आहेत. बाहेर आंंदोलकर्त्या कामगारांकडे सुरक्षा रक्षक सफाई करत असल्याचे फोटोही उपलब्ध आहेत.
आगरी-कोळी भवनाच्या सुरूवातीपासून हे १२ कामगार गेली ८ वर्ष तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. सुरूवातीच्या काळात अवघ्या ४८०० रूपये मासिक वेतनावर या कामगारांनी सफाईचे काम केले. त्यानंतर या कामगारांना ५६५६ रूपये मासिक वेतन देण्यात आले. आता या कामगारांना २६ दिवस भरल्यास ७२०० रूपये आणि ४ साप्ताहिक रजांवर काम केल्यास ८४०० रूपये वेतन देण्यात येत आहे.
या कामगारांना सुरूवातीपासून अत्यल्प वेतनावर काम करावे लागत असून सिडकोकडून तसेच ठेकेदारांकडून कोणत्याही विशेष सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. वेतनवाढीबाबत कामगारांनी वारंवार मागणी, िनवेदने करूनही कामगारांची दखल घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हे काम करणारे कामगार सारसोळे व नेरूळ गावातील ग्रामस्थच आहेत आणि ठेकेदारही नेरूळ गावातील ग्रामस्थच असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थ ठेकेदार व कामगारही ग्रामस्थच असताना संपावर कामगार गेलेले असतानाही ठेकेदाराने सुरक्षा रक्षकांकडून सफाईचे काम करवून घेतल्याचा संताप कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
१ जानेवारीपासून कामगार संपावर गेलेले असताना कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकारण्यांनी या कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही तसेच सिडकोकडूनही या कामगारांना भेटण्यासाठी कोणीही आलेले नाही. सलग ८ वर्षे आगरी-कोळी भवनात काम करूनही या कामगारांची सेवा अजून कायम झालेली नाही. तसेच या कामगारांना किमान वेतनही दिले जात नसून कामगारांचे आर्थिक शोषण केले जात आहे.
आगरी-कोळ भवनचे कामगार संपावर गेल्याचे समजताच सारसोळे गावचे ग्रामस्थ व महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी आगरी-कोळी भवनात जावून कामगारांशी चर्चा केली व त्यानंतर आगरी-कोळी भवनात जावून सिडको अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. लवकरच टेंडर ओपन होणार असून कामगारांना हवे असलेले वेतनही लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी मनोज मेहेर यांना दिली.