नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील मेरेडीअन टॉवरमध्ये १४ शॉट सर्कीटमुळे लागलेली आग अग्नीशमन विभागाच्या अथक प्रयासानंतर आटोक्यात आली. रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे नेरूळ सेक्टर सहा परिसरात काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले हेाते. परिसराचा विद्युत पुरवठाही काही काळ खंडीत करण्यात आला होता. शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी अग्नीशमन विभागाशी संपर्क साधून अग्नीशमनची वाहने घटनास्थळी आणून आग विझविण्यात महत्वाची भूमिका बजावली.
नेरूळ सेक्टर आठमधील काही रहीवाशी मेरेडीयनमध्ये रहावयास आले होते. त्यांनी आग लागल्याचे दिसताच तात्काळ रतन मांडवे यांच्याशी संपर्क साधत आगीची कल्पना दिली. मांडवे यांनी अग्नीशमन, पोलिस व रूग्णालय यांच्याशी संपर्क साधत त्यांना समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तात्काळ आमदार संदीप नाईकांचे कडवट समर्थक असणार्या संदीप खांडगेपाटील व प्रभाग ८७चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश रसाळ यांनी मेरेडियनमध्ये धाव घेतली.
मेरेडीयनच्या ए विंगमध्ये १४व्या मजल्यावरील १४०१ या सदनिकेत शॉर्ट सर्कीटमुळे रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या सदनिकेत भाडेकरू राहत असून त्यांनी आपले कपडे वाळविण्यासाठी विद्युत यंत्राचा वापर सुरू केला व ते खाली निघून आले. त्यातच वायरीची शॉर्ट सर्कीटची समस्या निर्माण होवून आग लागली. आगीने काही मिनिटातच भडका पसरला. त्यातच मेरेडीयन सोसायटीचे काम सुरू असल्याने सभोवताली बांबूच्या परांच्या बांधल्या होत्या. या बांबूनीही पेट घेतला होता. सुरूवातीला नेरूळ अग्नीशमनची एक गाडी आली. परंतु आगीचे प्रमाण पाहता१४ व्या मजल्यावरील आगीचे अग्नीशमनची वाशीतून मोठी गाडी मागविण्यात आली. इमारतीच्या तळाशी असणारी वाहने हटविण्यातच बराच वेळ गेला. अखेरीला सव्वा एक वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. १४०१ सदनिका या आगीत जळून भस्मसात झाली असून आजूबाजूच्या घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावेळी आगीमुळे घाबरलेल्या मेरेडीयन सोसायटीतील लोकांना दिलासा देण्याचे काम शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभाग ८६ चे वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार, शिवसेनेचे राजूशेठ आहेर, राजे प्रतिष्ठानचे जुईनगर-नेरूळचे अध्यक्ष अक्षय काळे, निलेश दौंडकर उपस्थित होते.
अग्नीशमनच्या कर्मचार्यांना मेरेडिअनची बंद असलेली अग्नीशमन यंत्रणा, वरच्या टाकीत पाण्याचा अभाव, तळाशी उभ्या असलेल्या पार्किगच्या गाड्या हटविण्यात गेलेला वेळ यामुळे आगीवर नियत्रंण मिळविताना तारेवरची कसरत करावी लागली.
* आमदार संदीप नाईकांची भूमिका महत्वाची ठरली
मेरेडिअन सोसायटीला आग लागताच त्या सोसायटीतील काही रहीवाशांनी तसेच नेरूळ सेक्टर सहामधील युवकांनी तात्काळ आमदार संदीप नाईकाशी संपर्क साधला. आमदार संदीप नाईकांनीही अग्नीशमनला संपर्क करत तात्काळ परिस्थिती नियत्रंणात आणण्याच्या सूचना केल्या. आग किती आहे,अग्नीशमच्या गाड्या पोहोचल्या का, काम सुरू झाले का, इतर काही घरांचे नुकसान झाले का, आग विझली का याबाबत आमदार संदीप नाईक रात्रीच्या दोन वाजेपर्यत सतत फोन करून आढावा घेत होते. ऐरोलीचे आमदार असतानाही संदीप नाईकांची आग विझविण्यासाठी असणारा पाठपुरावा व सतत चौकशी करणारे फोन मेरेडियन सोसायटीच्या तसेच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना जवळून पहावयास मिळाले.