मुंबई : विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी दडपशाही करून संप चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संप चिघळला असून मुंबईकरांना याचा मोठा फटका बसला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कर्मचार्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी माजी मंत्री आ. नसीम खान यांनी केली आहे.
मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या या संपामुळे रोज लाखो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. चोवीस तास सतत धावणारी मुंबई ठप्प पडते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि ही परिस्थिती राज्य सरकार आणि महापालिका उघड्या डोळ्यांनी हातावर हात ठेवून पाहात आहेत, हे सामान्य मुंबईकरांचे व चाकरमान्यांचे दुर्देव आहे. बेस्ट कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता असून त्याची संपूर्ण जबाबदारी सरकार व महापालिकेवर असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.