आमदार संदीप नाईक यांचे राज्यपालांना पत्र
नवी मुंबई : बेस्ट कर्मचार्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्याऐवजी राज्य शासन आणि मुंबई महापालिका त्यांच्यावर दडपशाही करीत आहे. त्यामुळे हस्तक्षेप करुन या कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागणीचे लेखी निवेदन आमदार संदीप नाईक यांनी राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांना १५ जानेवारी रोजी दिले आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देखील मागणीचे पत्र दिले आहे.
सेमवारी सुरु झालेल्या बेस्टच्या संपाचा बुधवारी दहावा दिवस आहे. आतापर्यत सर्वात लांबलेला हा संप ठरला आहे. मंगळवारी उच्चस्तरीय समितीची बैठक होवून त्यामधून काही तोडगा निघाला नाही. नवी मुंबईतील बेस्टच्या कर्मचार्यांनी आमदार संदीप नाईक यांची भेट घेवून त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. कैलास गायकर, किरण गिते, हिरामन पंचाळ, रणजित रुपनवार, मारुती कांबळे, सहयाजी गायकवाड, भुजबळ, सचिन ठोंबरे, सुभाष पाटील, आसिफ मनियार या बेस्ट कर्मचार्यांसमवेत शिवाजी खोपडे, किरण न्यायनित यांनी भेट घेतली. सुधारित वेतन करार, दिवाळीत सानुग्रह अनुदान, सेवानिवृत्त कर्मचार्यांची देणी एकरकमी अदा करणे इत्यादी बेस्ट कर्मचार्यांच्या रास्त मागण्या आहेत. त्या मान्य झाल्याच पाहिजे, तुटपुंज्या पगारावर या महागाईच्या काळात घर चालविणे या कर्मचार्यांसाठी कठिण आहे, असे मत आमदार नाईक यांनी मांडले असून मुंबई पालिका आणि सरकारच्या उदासिनतेमुळे नाईलाजास्तव बेस्ट कर्मचार्यांना हा संप सुरु ठेवावा लागतो आहे. या संपामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी बेस्ट सेवा पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी मुंबईकरांसह इतर शहरांतील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याचे काहीच सोयरेसुतक सरकार आणि पालिकेला नाही, अशी टीकाही आमदार नाईक यांनी केली आहे.