राजेंद्र पाटील
पनवेल : राज्यातील सरकार महिलांच्या सक्षमीकरणाच्या बढाया मारत आहे. प्रत्यक्षात सरकारला महिलांच्या संसाराचे धिंडवडे काढण्यात जास्त रस आहे. महिलांविरोधी धोरण राबबून सरकारने सर्वोच्च न्यायालयात शरणागती पत्करली आहे. त्यामुळे राज्यभर डान्सबारला मोकळे रान मिळाल्याने पुन्हा एकदा तरूणांसह महिलांच्या संसाराची राखरांगोळी होण्याची भीती व्यक्त करत डान्सबारविरोधी सरकारने त्वरीत सक्षम कायदा करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारच्या तोंडाला फेस आणू, असा इशारा डान्सबारविरोधी पनवेल संघर्ष समितीने आयोजित केलेल्या निषेध सभेत सर्वच वक्त्यांनी एकासूरात दिला.
पनवेल येथील नंदनवन कॉम्प्लेक्सनजिकच्या मैदानावर ही सभा काल, शनिवारी (ता.९) दुपारी संपन्न झाली. कडक उन्हात महिला आणि पुरूषांनी सभेला उपस्थित राहून डान्सबारविरोधी सूर आळविला. संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निषेध सभेला राष्ट्रवादीच्या आ. विद्याताई चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. उर्फ आबा यांच्या कन्या आणि आर. आर. पाटील फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिताताई पाटील, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई, कर्जतचे आ. सुरेश लाड यांच्या कन्या ऍड. प्रतीक्षा लाड आदी मान्यवर वक्त्यांनी डान्सबार विरोधी पनवेलमध्ये रणशिंग फुंकले. त्यावेळी सर्वच वक्त्यांनी राज्य सरकारला डान्सबारविरोधी सक्षम कायदा करण्याचे आवाहन केले.
————— ———————— ———————— –
आईची हत्या करून बारबालांवर पैसे उधळल्याने आबांनी आणली होती डान्सबार बंदीः स्मिता पाटील
राज्यात ३०७ बार शहरी तर ८४ ग्रामीण भागात होते. पनवेलमध्ये डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी एका तरूणाने आईची हत्या केली, त्यानंतर तिचे दागिने विकून ते पैसे बारबालावर उधळल्याची भयानक घटना घडली होती. दुसर्या घटनेत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची पदवी घेतलेल्या तरूणाने डान्सबारमध्ये उधळण्यासाठी पैसे नाहीत म्हणून चक्क लुटमारी करण्याचा विकृत मार्ग निवडला होता. या घटना जेव्हा तत्कालीन गृहमंत्री आबांच्या निदर्शनास आल्या, तेव्हा संवेदनशिल मनाचे आबा अतिशय व्यथित झाले होते. त्यांनी फार धाडसाने डान्सबार बंदीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, अशा आठवणींतून आबांच्या निर्णयाचे सूर त्यांच्या कन्या स्मिताताई पाटील यांनी आळविले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या होता.
महिलांना नाचवून त्यांच्या दलालीतून मिळालेला पैसा नरकासमान आहे, असे सांगत दलालीच्या पैशातून कधीच सन्मानाचे जीवन जगता येत नाही, असे स्मिता पाटील यांनी सांगून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची त्यांना आबांनी सांगितलेली गोष्टही भाषणातून सांगितली. त्या म्हणाल्या की, बाबासाहेबांना त्यांच्या चळवळीसाठी निधी हवा होता. तेव्हा राम गणेश गडकरी यांनी सांगितले की, तमाशातील कलाकार आपल्या चळवळीसाठी काही निधी देण्यास उत्सुक आहेत. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, महिलांनी नाचगाणे करून कमावलेल्या पैशावर माझी चळवळ उभारणार नाही. पाटील यांच्या या गोष्टीमुळे डॉ. आंबेडकर चळवळीचा पाया किती मजबूत आणि तो कोणत्या निकषावर आजही तग धरून आहे, त्याचा माहितीपट यानिमित्ताने अनेकांच्या डोळ्यात अंजन घालून गेला.
२०१३ मध्ये पुन्हा डान्सबार बंदी उठवण्यात आल्याने आबांनी सभागृहात कायदाच तयार केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. परंतु, २००५ मध्ये जेव्हा आबांनी बंदी आणली त्यानंतर आबा कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आबांना याविषयी विचारले तर त्यांनी ती धमक्यांची पत्रे केराच्या टोपलीत टाकण्याचा सल्ला दिला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
राज्यातील ४ टक्के मुली डान्सबारमध्ये तर परराज्यातील ९६ टक्के मुली काम करीत असताना त्यांच्या पूनर्वसनाची राज्य सरकारला चिंता का भेडसावत आहे, असा सवाल स्मिता पाटील यांनी उपस्थित करून, त्या-त्या राज्यातील महिलांच्या पूनर्वसनाची जबाबदारी त्या-त्या सरकारने घ्यावी, महाराष्ट्र सरकारला तो विचार करण्याची गरजच नाही, असे ठणकावून त्यांनी सांगितले.
डान्सबार हे वातानुकील खोल्यांध्ये चालतातय इथे त्यांचा निषेध करण्यासाठी उन्हात बसावे लागत असल्याने ही लढाई एसीविरूद्ध ऊन अशीच असल्याचे सांगत महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून अब्दुल हमीद यांच्यापर्यंत आणि संत ज्ञानेश्वरांपासून ते चोखामेळांपर्यतच्या संतांचा आहे. छत्रपती शाहू महाराजांपासून ते फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणारा असल्याने इथे डान्सबारची दहशत खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. महसूल वसुल करणार्या सरकारने २७ कोटी संसार उद्ध्वस्त करण्याचे पाप माथी मारून घेऊ नये असे सांगत पनवेल संघर्ष समितीच्या प्रत्येक लढ्यात कांतीलाल कडू यांच्या खांद्यावा खांदा लावून लढण्याचे त्यांना घोषित केले.
—————— —————————- ————————–
जोपर्यंत डान्सबार बंदीचा कायदा आणत नाही, तोपर्यंत शिवसेना-भाजपा सरकारला मतदान करू नकाः आ. विद्याताई चव्हाण
दोन्ही सभागृहात डान्सबारविरोधी कायदा करता येत असताना सरकारचे हात कुणी बांधले आहेत. युती सरकारची फूस असल्यानेच डान्सबार पुन्हा सुरू झाले आहेत, असा आरोप करून जर अधिवेशनापूर्वी सरकारने नव्याने सक्षम कायदा आणून डान्सबार बंदी आणली नाही, तर येत्या निवडणूकीत शिवसेना-भाजपा युतीला मतदानच करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीच्या अभ्यासू नेत्या, आ. विद्याताई चव्हाण यांनी केले.
आज महिलांसारखीच बिकट परिस्थिती शिक्षण घेणार्या तरूणांची झाली आहे. आईबाबांना वाटते, उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलं घराबाहेर गेली आहेत. परंतु, त्यांची मुले जेव्हा बारबालांच्या आहारी गेल्याचे समजते, तेव्हा त्यांच्या दुःखाला पारावार राहत नाही. तरूण आणि महिलांचे संसार उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, अशी लाजिरवाणी पाळी युती सरकारने महाराष्ट्रावर आणून ठेवली असल्याचा खरमरीत शब्दात त्यांनी समाचार घेतला.
महात्मा गांधींचे नाव असलेल्या मुंबईतील एका रस्त्यावर १७ डान्सबार होते. तेव्हा डान्सबारविरोधी कृती समिती निर्माण करून आंदोलन केल्याची आठवण त्यांनी सांगितली. आंदोलन करत असताना, दाढी-मिशावाले कमरेला पिस्तुल लावून धमकावत होते, परंतु आम्ही त्यांना भिक न घालता, चप्पलेने मारू असा थेट इशारा दिला होता, असे आक्रमक होत त्यांनी सांगितले.
दुसर्यांचे संसार उद्ध्वस्त करणार्यांच्या रोजीरोटीचा विचार करण्याची गरज नाही. डान्सबारच्या महिलांचे नेतृत्व करणार्या वर्षा काळे यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेत वकील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी ते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाने आ. चव्हाण यांनी शिमगा केला. त्यांनी डान्सबारविरोधी आबांच्या निर्णयाचे स्वागत करताना, भाजपाचे नेते गोपिनाथ मुंडे यांच्या नावाचा खास उल्लेख केला.
———————- ——————————- ———————————- ————————
बंदी आणा अन्यथा डान्सबार फोडूः तृप्ती देसाई
डान्सबारमध्ये सरकारला काहीही आक्षेपार्ह वाटत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या सभागृहात डान्सबार सुरू करावा, अशी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत डान्सबारविरोधी त्वरीत अध्यादेश काढा अन्यथा, प्रत्येक डान्सबारमध्ये घुसून तोडफोड केली जाईल, असा खणखणीत इशाराच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.
त्यांनी आपला मोर्चा पोलिसांकडे वळवून गृहखात्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांचे वस्त्रहरण केले. पोलिसांना राज्य सरकार पगार देत असताना त्यांना डान्सबार चालविण्याचे वेगळे हफ्ते कशाला हवेत, असा जळजळीत प्रश्न विचारत पोलिसांच्या खाबूगिरीमुळेच डान्सबार फोफावले असल्याची टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, परंतु दुसर्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार घटनेने कुणालाही दिलेला नाही. मग डान्सबार हवेतच कशाला? महिलांचे संसार उद्ध्वस्त होताना सरकाला जराही पाझ़र फुटू नये, हे त्यांची संवेदनाच गोठल्याचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
गदी कधी महत्वाची नसते, ददी हवे असतात अशी भाषणाला सुरूवात करून पनवेल संघर्ष समितीच्या समाजमनाचे रक्षण करणार्या धाडसी निर्णयाचे त्यांनी दिलखुलासपणे स्वागत केले. आंदोलनाची भाषा सरकारला करत नसेल तर कायदा हातात घ्यावा लागेल. ती तयारी आम्ही ठेवली आहे. हे सरकार फसवे आहे. त्यांचा अभ्यास अद्याप पूर्ण होत नाही. अध्यादेश काढू, निर्णय घेऊ, अशी आश्वासनांची खैरात करणारे सरकार आहे. आंदोलकांना कारागृहात टाकण्याची कुटनिती सरकारची असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कृषी कन्यांच्या आंदोनावर त्यांनी पोटतिडकीने मत मांडून सरकाचे वाभोडे काढले. तसेच हिंमत असेल तर शेतकर्यांचा सात-बारा कोरा करावा, असे आव्हानही देसाई यांनी दिले.
————————— ——————————— ———————————— ————–
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ही थेरं चालू देणार नाहीः ऍड. प्रतीक्षा लाड
स्वराज्याचे तोरण बांधणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात डान्सबारची थेरं आणि युती सरकारचा लाळघोटेपणा चालू देणार नाही. महिलांचे अश्रू जर आपुलकीने सरकारला पुसता येत नसतील तर या सरकारला वठणीवर आणण्यासाठी डान्सबारविरोधी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा कर्जतचे आ. सुरेश लाड यांच्या कन्या ऍड. प्रतीक्षा लाड यांनी दिला.
आबांनी गृहमंत्री असताना संवेदनशिलता जपून डान्सबार बंदीचा निर्णय घेतला. तो धाडसी निर्णय शिवाजी महाराजांच्या महिलांविषयी आत्मियतेचा होता. या सरकारला त्याचे काहीही देणंघेणं नाही. महिलांना सक्षमपणे जगण्यासाठी आधार द्यावा, असे सरकारला वाटत नाही. त्यांनी महिलांची सुरक्षा वार्यावर सोडली आहे. पनवेल-उरणमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे पनवेलमध्ये जे सुरू आहे, त्याचे पडसाद कर्जतमध्ये उमटतात. त्यामुळे कर्जतर पनवेलकरांच्या सोबत राहून डान्सबारविरोधी आंदोलन करण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची संस्कृती सरकारने शिकून घ्यावी, असा टोला ऍड. लाड यांनी हाणला. कांतीलाल कडू यांच्या संघर्ष समितीने ठोस निर्णय घेऊन डान्सबार विकृतीला विरोध केला त्यातून आज सरकारविरोधी ठिणगी पडली आहे. आता लवकच वणवा पेटेल आणि त्यात हे सरकार भस्मसात होईल, इतका तळतळाट महिलांचा लागले, असे त्यांनी सांगितले.
———————— —————————————— ————————-
सरकारची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आलीः कांतीलाल कडू
ज्या सरकारला महाराष्ट्रातील तरूणींच्या नोकरीबाबत काहीही संवेदना नाहीत, प्रकल्पग्रस्तांच्या पोटापाण्याची अजिबात विचार मनाला शिवत नाही. बालवाडी, अंगणवाडी, जेएनपीटी, एमआयडीसी किंवा स्थानिक प्रकल्पात महिला, तेेथील प्रकल्पग्रस्तांच्याबाबतीत नोकरीचा कधी साधा प्रश्न पडत नाही, त्या सरकारने डान्सबारमध्ये काम करणार्या परप्रांतिय महिलांच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलावं, ही लाजिरवाणी बाब असल्याने महाराष्ट्राच्या चार रणरागिणी सरकारला खांदा देण्यासाठी आल्या आहेत आणि आपण आता मडके घेऊन पुढे राहणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सांगितले.
आबा आज हयात असते तर डान्सबार पुन्हा सुरू करण्याची कुणी हिंमत दाखविली नसती. 70 हजार महिला डान्सबारमध्ये काम करीत असल्याचा दावा डान्सबार मालकांनी न्यायालयात केला. याची खरी आकडेवारी सरकारने हिंमत असल्यास घोषित करावी, असे आव्हान कडू यांनी सरकारला दिले. त्या महिला कुठून येतात? काय करतात? याची माहिती सरकारने न्यायालयाला देणे बंधनकारक होते. परंतु, सरकारने जाणीवपूर्वक शेपूट घातले, यात त्यांचा निवडणूक जुमला असल्याचा गंभीर आरोप कडू यांनी केला.
पनवेलला डान्सबारचा कलंक लागला आहे. श्रमाशिवाय कमावलेला पैसा नरकात जाण्याचा मार्ग ठरतो. तोच पैसा पुढे निवडणूकीत वापरून लोकशाहीचा खून केला जातो. इथे एकाही शेट्टी कंपनीचे डान्सबार नसून ते काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाड्याने दिले आहेत. त्या जागा त्वरीत खाली करून डान्सबार बंदीसाठी त्या -त्या पक्षाच्या नेत्यांनी काम करायला हवे होते. परंतु, राजकीय नेत्यांचे दात हत्तीसारखे असल्याने पनवेलच्या संस्कृतीचे मढे रचले गेले आहेत. त्यात राजकीय नेत्यांचा फार मोठा हात असल्याने डान्सबार चालक, मालक निर्ढावले असल्याने सरकारने जर त्वरीत अध्यादेश काढून डान्सबार बंदीचा कायदा आणला नाही तर होणार्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी सरकार आणि डान्सबारसाठी पडद्याआडून मदत करणार्या राजकीय नेत्यांनी ठेवावी, असा गंभीर इशाराच कडू यांनी दिला.
यावेळी पिपल्स रिब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव नरेंद्र गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे आदींची भाषणे झाली. व्यासपिठावर मिताली पाटील, पनवेल अर्बन बँकेंच्या संचालिका विद्या चव्हाण, खारघर रोटरीच्या संचालिका तथा राष्ट्रवादीच्या नेत्या संध्या शरब्रिदे, प्रा. एल. बी. पाटील, मनसेचे शहराध्यक्ष शितल शिलकर, मोहन डाकी, भूमाताचे कांतीलाल गव्हाणे, राजश्री पाटील, राजकुमार पाटील, आनंद भंडारी आदी मान्यवर होते.
उपस्थितांचे स्वागत पनवेल पनवेल संघर्ष समितीचे सचिव चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, कांतीलाल प्रतिष्ठानचे खजिनदार आनंद पाटील, सचिन पाटील, सुरज म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे, महेंद्र विचारे आदींनी केले.