नवी मुंबई : २१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून नवी मुंबई नांवाजली जात असताना येथील नागरी सेवा सुविधांचा दर्जा सर्वोत्तम राखण्याकडे नेहमीच नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे. यामुळेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई हे राहण्यायोग्य शहरात देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नांवाजले गेले आहे. यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच आगामी सन २०१९-२० वर्षाचा महानगरपालिका अर्थसंकल्प सादर होत असताना त्यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या मनातील संकल्पनांचे प्रतिबिंब पडावे व लोकाभिमुख अर्थसंकल्प असावा अशी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भूमिका आहे. म्हणूनच महापौर जयवंत सुतार यांच्या वतीने समस्त नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी आपल्या मनातील नागरी सुविधा कामांविषयीच्या सूचना, संकल्पना लेखी स्वरुपात महापौर कार्यालय, चौथा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सेक्टर-१५ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे द्याव्यात अथवाjaywant_sutar@nmmconline.com या ईमेलवर पाठवाव्यात. जेणेकरुन यामधील मौल्यवान सूचना, संकल्पनांचा अंतर्भाव नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात करता येईल व याचा उपयोग नवी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासात होईल.