आज २७ फेब्रुवारी, जागतिक मराठी भाषा दिन. पण हा जागतिक भाषा दिन आल्यावरच मराठी भाषिकांना मराठी भाषेचे स्मरण व्हावे ही आजची शोकांतिका आहे. १ मे १९६० साली निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई व या राज्याची राजभाषा मराठी. पण या राज्याच्या राजधानीत मराठी भाषेच्या खासगी व पालिका शाळा धडाधड बंद पडू लागल्या. ‘कुणी घर देता का घर’ या धर्तीवर ‘कुणी मराठी शाळेत मुलगा घालता का हो’ असा टाहो फोडण्याची वेळ मराठी शाळांच्या शिक्षकांवर आली आहे. बरे शाळा बंद होवून शिक्षकांवर ‘सरप्लस’ होण्याची वेळ आली तरी अन्यत्र ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई अगदी रायगड जिल्ह्याच्या शाळांमध्ये मराठी शाळेतील शिक्षकांच्या जागा रिक्त नसल्याने त्यांच्यावर सक्तीची बेरोजगारी आली आहे. त्यामुळे ही बेरोजगारी टाळण्यासाठी संबंधित शिक्षकांना आपल्या परिवाराला व राहत्या घराला सोडून लांबवर असणाऱ्या आदिवासी शाळांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. मुळातच मराठी शाळा बंद केवळ मुंबई शहर व उपनगरातच नाही तर नवी मुंबई व ठाण्यासारख्या शहरापर्यतही मराठी शाळा बंद पडण्याचे लोण पोहोचले आहे. मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रातच मराठी शाळांची, मराठी शिक्षकांची व मराठी भाषेची उपेक्षा व्हावी याचाच अर्थ बंगल्याच्या मूळ मालकाला व्हरांड्यात झोपण्याची वेळ येवून कालपरवा आलेल्या भाडेकरूंनी (अन्य भाषांनी) बंगल्यावर स्वामित्व गाजविण्याचा प्रकार आहे.
‘अमृतातही पैजा जिंके, अशी माझी मराठी बोली’ हे ऐकण्यास, समजण्यास, उमजण्यास कितीतरी अभिमानास्पद वाटते. परंतु आज इंग्रजी भाषेचा झालेला बोलबाला पाहता भाषिक साम्राज्यामध्ये माय (मराठी भाषा) मरो, अन् मावशी (इंग्रजी भाषा)’ या उक्तीचा शाळांशाळांमध्ये प्रत्यय येवू लागला आहे. मराठी ही मातृभाषा असली तरी जागतिक पातळीवर व्यवहार करण्यास मराठी भाषेला मर्यादा पडल्या, त्यामुळे घरामध्ये बोलण्या-चालण्याइतपतच मराठी भाषा योग्य असल्याचा समज मराठी भाषिकांनीच करून घेतला आहे. व्यवहारात अग्रक्रम असणाऱ्या इंग्रजी भाषेला आपलेसे करताना मराठी भाषेला केवळ व्यवहारातूनच नाही तर घरातून, संभाषणातूनही कधी हद्दपार केले ते मराठी भाषिकांनाही काळाच्या ओघात समजलेच नाही. काल परवा आजी-आजोबा, आई-बाबा या शब्दांची उधळण होणाऱ्या आपल्या मराठी भाषिकांच्या घरात आज ‘मॉम-डॅड, ग्रॅण्डमा-ग्रॅण्डपा’ या शब्दांचे बस्तान बसले आहे. त्यामुळे कधीकाळी नजीकच्या भविष्यात मराठी भाषा आमच्या घरात होती, ही मराठी भाषा होती, ही मराठी भाषेचे अक्षरे होती, असे सांगण्याची वेळ मराठी भाषिकांवर आल्यास कोणालाही अतिशयोक्ती वाटणार नाही.
इंग्रजी भाषेला डोक्यावर घेवून नाचताना आपणास आपल्याच देशातील दाक्षिणात्य लोकांचा विसर पडला. त्यांनी कामकाजात इंग्रजी भाषा स्वीकारली असली तरी बोली भाषा व मार्केट तसेच दैनंदिन व्यवहारात आपल्या कन्नड, तामिळ या मातृभाषेचे उदात्तीकरण करण्यास कधीही हात आखडता घेतला नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी तेथील लोकांनी हिंदीला कधीही मनापासून स्वीकारले नाही. इंग्रजी जागतिक पातळीवरची भषा असतानाही त्यांनी इंग्रजील कन्नड व तामिळ भाषेनंतरचेच स्थान दिले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वावरताना अथवा तेथील स्थानिकांशी संभाषण करताना आपली अडचण होते. परंतु आपण हाच कित्ता न गिरविल्याने आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात वावरताना देशातील कोणाही माणसाची कोंडी होत नाही. आपल्या लोकांचे हिंदी व इंग्रजी भाषेवर प्राबल्य नसले तरी तोडक्या मोडक्या भाषेत का होईना आपण इतर राज्यातील लोकांशी संभाषण साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्याशी मराठीतून सुसंवाद साधण्यास आपणास कमीपणा वाटतो. मुळातच या कमीपणापायी आपणच आपल्या हातून आपल्या मराठी भाषेची नकळत हत्या करतोय, हेही आपल्या लक्षात येत नाही.
घरामध्ये मुलगा अथवा मुलगी जन्माला आल्याबरोबर त्याला इंग्रजी, सेमी इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई यापैकी कोणत्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा यावरून पालकांमध्ये विचारमंथन सुरू होते. साधारणत: सहा –सात महिन्याच्या बालकाला काही प्रमाणात समज व उमज येण्यास सुरूवात झाल्यावर त्यांच्या कानावर चांदोबा चांदोबा लपलास, येरे येरे पावसा, अशी मराठी या मराठी बडबड गीतांऐवजी ‘जॉनी जॉनी एस पापा,‘ रेन रेन गो अवे’ ही इंग्रजी भाषेतील गाणी लहान बालकांच्या कानावर पडत असतात. ज्या बाळाचा समजाय-उमजायचा पायाच इंग्रजी बडबडगीतांवर रचला जातो, त्या बालकांकडून आपण उभ्या आयुष्यात कधीही तुकाराम महाराजाच्या व ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाची काय अपेक्षा ठेवणार. आताच्याच पिढीला म्हणजेच लहान बालकांच्या पालकांना वि.वा.शिरवाडकर, पु.ल. देशपांडे, कवी नारायण सुर्वे. महान साहित्यिक वि.स.खांडेकर माहिती नाहीत. काल परवा चारोळीच्या माध्यमातून चंद्रशेखर गोखलेही माहिती नसणार. नवजात शिशूंना जन्म देणाऱ्या माता-पित्यांची भाषिक वाटचालही त्यांच्या बालपणापासून इंग्रजीच्या वहिवाटीवर आधारलेरली असल्यामुळे आताच्या लहान बालकांकडून काय अपेक्षा ठेवणार? मुळातच आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
मराठी शाळांनाच टाळे लागले असल्यामुळे त्यापाठोपाठ शहरातील, उपनगरातील मराठी भाषेचे खासगी कोचिंग क्लासेसलाही दशकभरापासूनच टाळे लागण्यास सुरूवात झालेली आहे. केवळ भाषेतच नाही तर मुंबई शहर-उपनगरातून मराठी भाषिकांचे निवासी कार्यक्षेत्रातील अस्तित्व आता नगण्य दिसू लागले आहे. गिरणगावातील मराठी टक्का आता कल्याण-डोंबिवली, पनवेल-वाशी, बदलापूर-विरारपर्यत विसावल्याने शहर-उपनगरातील वापरातील मराठी भाषाही मुंबई शहर-उपनगरातून बाहेरील भागात भाषिकांपाठोपाठ निघून गेली आहे. मराठी भाषा आज अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. पण या भाषेचा संघर्ष नेमका कोणाबरोबर आहे? मराठी भाषेची आजही हत्या कोण करत आहे? मराठी भाषा संपविण्याचे षडयंत्र करण्याची जबाबदारी अन्य भाषिकांनी उचलली नाही तर ते पातक मराठी भाषिकांनी आपल्याच हातून केले आहे. घरातील वापरातूनही मराठी भाषा हद्दपार झाली आहे. घरातील टेबलांवर एकेकाळी नवाकाळ, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता आदी वर्तमानपत्रांनी जागा व्यापलेली असायची. आज त्याच टेबलावर टाईम्स ऑफ इंडिया, हिंदूस्थान टाईम्स, डीएनएसारखी इंग्रजी वर्तमानपत्र विसावलेली आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचे मारेकरी मराठी भाषिकच बनले आहेत. मराठी भाषेच्या अस्तित्वाची घरघर ही बाब चिंतनाची असली तरी त्यावर चिंतन करणारे, कळवळा करणारे घटकही ढोंगी आहेत. व्यासपिठावरून चिंतन करणारे, राजकारणात मराठी भाषेचा व मराठी भाषिकांचा कळवळा आणणाऱ्यांची मुलेदेखील कॉनव्हेंट शाळेतच शिक्षण घेत असल्याची दिसून येतात.
ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिगचा धोका टाळण्यासाठी व वसुंधरेवरील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाची व वृक्षसंवर्धनाची चळवळ मागील दशकभरापासून जोर धरू लागली आहे. त्याचधर्तीवर मराठी भाषेच्या रक्षणासाठी आता एक चळवळ मराठी भाषिकांमध्येच बेंबीच्या देठापासून निर्माण झाली पाहिजे. मराठी भाषेच्या शाळेत शिक्षणाचा आग्रह धरणे अथवा सक्ती करणे ही बालिश संकल्पना आजच्या काळात ठरू शकते. व्यावहारिक व स्पर्धेच्या युगात इंग्रजीचा झालेला बोलबाला पाहता मराठी शाळांमध्ये मुले पाठविण्यास सहजासहजी कोणीही तयार होणार नाही. भव्य दिव्य करण्यासाठी योग्य वेळ यावी लागत नाही तर ती वेळ घडवून आणावी लागते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किमान मराठी भाषिकांनी घरामध्येच अधिकाधिक संभाषणाची सुरूवात मराठी भाषेतच करावी. घरातील सदस्यांमध्ये, मित्रमंडळींमध्ये अथवा व्यवहारामध्ये, नातलगांमध्ये संभाषणात मराठी भाषेचा वापर केल्यास किमान मराठी भाषेचे अस्तित्व प्रभावीपणे दिसून येईल. एकदा अस्तित्व जोपासल्यास त्याची वाढ करणे अवघड जात नाही. इंग्रजी भाषेचे भूत काही प्रमाणात डोक्यावरून उतरवल्यास व शेजारील कन्नड व तामिळ भाषिकांचा आदर्श घेतल्यास मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात मराठी भाषेचा वारू चौखूर उधळण्यास फारसा वेळ लागणार नाही. मराठी भाषेचा दर्जा हा वादातीत आहे. मराठी भाषेतील साहित्याची विपुल संपदा आहे. अन्य भाषेच्या तुलनेत मराठी भाषा निश्चितच समृध्द व संपन्न अशी आहे. परंतु घर फिरले की घराचे वासेही फिरतात या उक्तीप्रमाणे मराठी भाषिकांनीच मराठी भाषेबाबत अनास्था दाखविल्याने मराठीला आज अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल. हेही दिवस जातील, पण त्यासाठी मराठी भाषिकांनी मानसिकता बनविली पाहिजे. मराठी भाषेबाबत आजवर केलेल्या अनास्थारूपी पापाचे प्रायश्चितही आता मराठी भाषिकांनाच घ्यावी लागणार आहे.
:- संदीप खांडगेपाटील:-
(साभार : दै. नवराष्ट्र : नवराष्ट्रच्या अंकात प्रसिध्द झालेला हा लेख नवी मुंबई लाईव्हच्या वाचकांसाठी प्रसिध्द करत आहोत)