स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविणे हे कर्तव्य मानून प्रत्येक विभागाच्या गरजा लक्षात घेऊन नागरी सुविधांची परिपूर्ती केली जात असून कोपरखैरणे विभागातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्वाच्या अशा नागरी आरोग्य केंद्राच्या अद्ययावत इमारतीचे भूमिपुजन व आरोग्य संवर्धनासाठी गरजेच्या ओपन जीमचे उद्घाटन करताना आनंद होत असल्याचे मत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ५२ कोपरखैरणे येथे सेक्टर १४ मधील भूखंड क्रमांक २२ वर उभारण्यात येत असलेल्या नागरी आरोग्य केंद्र भूमिपुजन व प्रभाग निधीतून कर्मविर भाऊराव पाटील उद्यानात उभारण्यात आलेल्या ओपन जीम उद्घाटन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांचेसमवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृहनेते श्री. रविंद्र इथापे, शिवसेना पक्षप्रतोद तथा नगरसेवक श्री. व्दारकानाथ भोईर, आरोग्य समितीच्या सभापती श्रीम. वैशाली नाईक, पाणी पुरवठा समितीचे सभापती श्री. शंकर मोरे, स्थानिक नगरसेविका श्रीम. निर्मला कचरे, नगरसेवक श्री. देविदास हांडेपाटील, श्री. लिलाधर नाईक, ॲड. भारती पाटील, माजी नगरसेवक श्री. केशव म्हात्रे, श्रीम. रंजना शिंत्रे, श्री. रविकांत पाटील, कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी, श्री. ऋषिकांत शिंदे, श्री.आनंदराव कचरे, श्री. प्रविण म्हात्रे, श्री. शरद घोरपडे, श्री. डी.आर.पाटील, श्री. सुर्यकांत कचरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार श्री. संदीप नाईक यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नवी मुंबई शहराच्या आजच्या नावलौकीकामध्ये सुरुवातीपासून घेतलेल्या दूरदृष्टीच्या निर्णयाचा अत्यंत महत्वाचा भाग असल्याचे नमूद करीत विविध उदाहरणांतून येथील विविध नागरी सुविधांच्या गुणवत्तेची प्रशंसा केली. कोपरखैरणे विभागातील हा प्रभाग इतर अनेक प्रभागांना जोडणारा मध्यवर्ती प्रभाग असून त्यामुळे येथील सुविधांचा लाभ कोपरखैरणेतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या प्रभागातील नागरी सुविधांसाठी आपण जास्तीत जास्त आमदार निधी दिल्याचे त्यांनी नमूद केले. शहर आरोग्य संपन्न व्हावे या धारणेतून ओपन जीम व वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून नागरी आरोग्य केंद्र उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे यांनी नवी मुंबई महानगरपालिका पुरवित असलेल्या सुविधांचा दर्जा उत्तम राखण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यामुळेच नवी मुंबईचा गौरव राज्य व राष्ट्रीय पातळीवर सातत्याने होत असल्याचे नमूद केले.
शिवसेना पक्षप्रतोद तथा नगरसेवक श्री. व्दारकानाथ भोईर यांनी स्थानिक नगरसेविका श्रीम. निर्मला कचरे या मितभाषी असल्या तरी सुविधा कामाचा योग्य प्रकारे पाठपुरावा करून ती मंजूर करून घेण्यात आघाडीवर असतात अशा शब्दात कार्यपध्दतीचे कौतुक केले.
स्थानिक नगरसेविका श्रीम. निर्मला कचरे यांनी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी दोन चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता आल्या याबद्दल समाधान व्यक्त करीत याठिकाणी पर्यायी रस्त्याचे नियोजन करावे अशी मागणी केली. यावर महापौर श्री. जयवंत सुतार यांनी अडथळामुक्त वाहतुकीसाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगत याविषयी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
कोपऱखैरणे सेक्टर १४ येथे भूखंड क्रमांक २२ वर नागरिकांना वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६०० चौ.मी.च्या भूखंड क्षेत्रफळात तीन मजली नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधली जात असून या प्रकल्पासाठी साधारणत: २ कोटी ६७ लक्ष इतका अंदाजित खर्च होणार आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधेच्या दृष्टीने इमारत रचना करण्यात आलेली आहे.
याशिवाय सेक्टर १४ मधील कर्मवीर भाऊराव पाटील उद्यानात नगरसेविका श्रीम. निर्मला कचरे यांच्या प्रभाग निधीतून ओपन जीम उभारण्यात आली असून त्याठिकाणी व्यायामाचे साहित्य बसविलेली जागेचा पाया चांगल्या प्रकारे केला असल्याचा उल्लेख सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे यांनी केला.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये या नागरी आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा उपलब्ध होत असताना कोपरखैरणे विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.