महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभेतील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी सोमवारी, दि. ११ मार्च रोजी दादर येथील शिवसेना भवनात जावून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचा विधानसभेतील खातेफलक हा या सभागृहात कोरा झाला. हे कधीतरी होणारच होते. सोनावणे जुन्नरमधून निवडून आल्यापासून त्यांच्या पक्षांतराविषयी चर्चा रंगतच होत्या. तब्बल साडे चार वर्षाच्या कालावधीत आमदार शरद सोनावणे हे त्यांच्या कामामुळे कमी गाजले, परंतु ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अथवा शिवसेनेत तर कधी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनीच अधिक प्रकाशझोतात राहीले. शरद सोनावणे हे त्यांच्या सामाजिक कामामुळे निवडून आले आहे, ही बाब जगजाहीर आहे. शरद सोनावणे हे मूळचे शिवसैनिकच. त्यांचा राजकीय प्रवासही आयाराम-गयारामच राहीला आहे. नवी मुंबई महानगरपालीकेतही त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वाशीत निवडणूक लढविली होती. परंतु या निवडणूकीत ते पराभूत झाले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट आवारातही शरद सोनावणेंची उठबस व बऱ्यापैकी प्रभाव असल्यामुळे ते बाजार समितीच्या संचालकपदाचीही निवडणूक लढवतील, अशाही चर्चा काही काळापूर्वी बाजार समिती आवारात रंगल्या होत्या. कॉंग्रेस-शिवसेना-मनसे- व आता परत शिवसेना असे राजकीय वर्तुळ शरद सोनावणे यांनी पूर्ण केले आहे.
शरद सोनावणे यांना २००९ सालच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेकडून तिकिटही जाहीर करण्यात आले होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातही उमेदवारी यादीत त्यांचे नावही होते. पण अचानक कोठे माशी शिंकली कोणास ठाऊक? ऐनवेळी दुसऱ्याच दिवशी सोनावणे यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करून शिवसेनेची रणरागिनी असलेल्या आशाताई बुचके यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत काहीही व कोणत्याही क्षणी होवू शकते, याची शरद सोनावणेंना नक्कीच जाणिव असणार. सामनातून जाहिर झालेली उमेदवारीही रद्द होवू शकते याचाही अनुभव शरद सोनावणेंना आलेली आहे.
२००९च्या निवडणूकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यावर शरद सोनावणेंनी पूर्णवेळ जुन्नर तालुक्याला समर्पित केले. राजकारणी म्हणून नाही तर एक समाजकारणी या नात्याने त्यांनी ५ वर्षात जुन्नर तालुका सातत्याने पिंजून काढला. सामाजिक कार्याचा रतीब टाकला. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनातून शरद सोनावणे हे घराघरात पोहोचले. त्याची पोचपावती जुन्नरवासियांनी त्यांना २०१४ सालच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीतही दिली. ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवित आहेत, याला महत्व न देता केवळ आणि केवळ शरद सोनावणेंसाठी जुन्नरवासियांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वल्लभ बेनके, शिवसेनेच्या आशाताई बुचके या रथी-महारथींना पराभूत केले.
शरद सोनावणेंनीदेखील जुन्नरकरांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू दिला नाही. मनसेचा एकमेव आमदार असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांचा रतीब टाकला. ओतूरमध्ये बनविलेल्या कुस्तीच्या आखाड्यामुळे शरद सोनावणेंचे नाव महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींच्या माध्यमातून घराघरात एव्हाना पोहोचले आहे.
पण ही झाली नाण्याची एक बाजू. एक बाजू जितकी सुखद आहे, तितकीच दुसरी बाजू तपासून पाहणे आवश्यक आहे. शरद सोनावणेंच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अतुल बेनके, शिवसेनेच्या आशाताई बुचके यांनी जुन्नर तालुक्यात मोर्चेबांधणी केली. सोनावणेंना काम करूनही विरोधकांच्या तगड्या आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र जुन्नर तालुक्यातील गावागावात पहावयास मिळत आहे. त्यातच शरद सोनावणेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जुन्नर तालुक्यातील राज ठाकरेंवर प्रेम करणारा मनसैनिक निश्चितच दुखावला गेला असणार, संतप्त झाला असणार. याचा वचपा काढण्यासाठी मनसैनिक निश्चितच ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची वाट पाहत असणार.
सोनावणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कडवट शिवसैनिक दुखावले जाण्याची शक्यता आहे. सोनावणे यांनी मागील निवडणूक शिवसेनेच्या विरोधात लढविली होती. मागील निवडणूकीसाठी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. सोनावणेंच्या विरोधात शिवसेनेच्या आशाताई बुचकेंनी पक्षबांधणी भक्कम केली होती. त्यामुळे सोनावणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बुचके यांचे विधानसभेचे तिकीट कापले जाणार हे आता उघड झाले आहे. आशाताई बुचकेंचे समर्थक व त्यांना मानणारा शिवसैनिक सोनावणे यांचे कितपत मनापासून काम करेल याबाबत आजही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अतुल बेनकेंनी मागील पाच वर्षात जुन्नर तालुक्यात चांगलीच मुसंडी मारली आहे. नुकतेच अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची पर्यायाने अतुल बेनकेंची बाजू अधिकच मजबूत झाली आहे. शरद सोनावणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले असले तरी सोनावणेंच्या वाटचालीत त्यांना बाहेरील विरोधकांसोबत शिवसेनेतील विरोधकांचाही सामना करावा लागणार आहे. वाटचाल खडतर असणार असल्याची जाणिव शरद सोनावणेंनाही असणार.
– संदीप खांडगेपाटील
साभार : दै. नवराष्ट्र