* कोपरखैरणेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ
नवी मुंबई : देशात असणारी मोदी लाट मोडीत काढण्याचे काम नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करीत पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला. शेतकरी, कामगार, तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटणार्या आणि मागील पाच वर्षात खोटी आश्वासने देणारे केंद्रातील भाजपा-मोदी सरकारला आता घरचा आहेर देण्याची वेळ आली आहे. जशी मोदी लाट मोडीत काढली तशी आता ठाणे लोकसभा मतदार संघाचे उच्चशिक्षित उमेदवार आनंद परांजपे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे अभ्यासू उमेदवार बाबाजी पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करुन केंद्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात नवी मुंबईपासून करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
२५-ठाणे लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा बूथ कमिटी मार्गदर्शक मेळावा आज शनिवारी कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना पवार यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, लोकनेते गणेश नाईक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राहुल जगताप, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, युवक अध्यक्ष सुरज पाटील, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, अल्पसंख्याक सेलचे जब्बार खान, सेवा दलाचे अध्यक्ष दिनेश पारख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या खासदारांनी पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन केले. आता त्या कार्यालयात एकही माणूस नाही तर सुविधा नाहीत त्यामुळे त्यांचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न उघड झाल्याचे म्हटले. डॉ.संजीव नाईक यांनी ५ वर्षात जेवढी कामे केली त्यापैकी अर्धी-निम्मी कामे देखील विद्यमान खासदारांनी केली नसल्याचे सांगत बोनकोडे रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव राजकीय हेतूने गुंडाळल्याची टीका पाटील यांनी केली. लोकनेते गणेश नाईक, प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव नाईक यांच्यामुळेच नवी मुंबईची सर्वांगिण प्रगती झा़ली आहे. स्वच्छतेत इतर शहरांना मागे टाकत नवी मुंबई शहराने मिळविलेले मानांकन ही त्याची पोचपावती असल्याचे पाटील म्हणाले.
सत्तापरिवर्तनासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहा, असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी नवी मुंबईची ओळख ही गणेश नाईक आहे. परांजपे हे चारित्र्य संपन्न आणि सुशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांनाच नवी मुंबईकरांचा कौल मिळेल? असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना पवार यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचला. बाहेरच्या देशातून काळा पैसा आणण्याचे सरकारचे आश्वासन कुठे विरले? असा प्रश्न उपस्थित केला. काळया पैशाचे अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारने नोटा बंदी केली. या निर्णयामुळे काळा पैसा भारतात आला नाही असे सांगत चुकीच्या निर्णयाचा फटका हा देशभरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी कामगार यांना बसला असल्याचे पवार म्हणाले. देशात बेराजगारी वाढली आहे तर जाती -जातीत भांडणे लावण्याचे काम सरकारने केले आहे. सरकारच्या खोटया आश्वासनामुळे जनता त्रस्त झाली असून भारत देश २५ वर्ष मागे गेल्याची टीका पवार यांनी मोदी सरकारवर केली.
पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ला पाहता जर देशाची सीमा सुरक्षित नाही तर आपण कसे सुरक्षित आहोत, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्व बैठकीला पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री धुळयात राजकीय भाषणबाजी करीत होते. त्यामुळे ५६ इंचाची छाती बडविणार्या सत्ताधार्यांना देशाची किती काळजी आहे? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. राफेल विमानाची किंमत ही आघाडीच्या सरकारच्या काळात ३५० कोटी रुपये होती ती मोदी सरकारच्या काळात २०१५ साली ६७० कोटींवर गेली. त्यानंतर अंबानी आणि जोसेफ यांच्या बैठकीनंतर राफेलची किंमत ही १६५० कोटींवर पोहोचली, ही शरमेची बाब आहे. याबाबत संसदेत आवाज उठविल्यानंतर सुरक्षा गोपनीयतेचे कारण पुढे करीत टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार म्हणजे देशहिताशी खेळण्याचा प्रकार असल्याची टीका पवार यांनी केली.
* संविधान मोडणार्यांना धडा शिकवा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले आहे. भारतीय संविधानात बदल करुन संविधान मोडण्याचे काम सत्ताधारी करीत आहे. याचा परिणाम हा देशावर होणार असून आपण कदापी संविधानावर घाला घालू देणार नाही, असा इशारा देखील पवार यांनी दिला.आपल्या हक्कासाठी आंदोलन करणार्यांवर पोलिसांमार्फत दबाव टाकत १०-१० तास पोलिस स्टेशनला बसवून गुन्हे दाखल केले जातात. हा प्रकार संविधानाने दिलेला अधिकार हिरावून घेणारा असल्याचे पवार म्हणाले. सत्तेवर नाचणार्या पोलिसांना सरकार जाते आाणि सरकार येते, असे सांगत सत्तेचा गैरवापर करणार्यांकडे जाऊ नका, अन्यथा अडचणीत याला असा इशारा देखील पवार यांनी दिला.
आनंद परांजपे नाही तर गणेश नाईक रिंगणात आहे असे समजून कार्यकर्त्यांनी येणार्या निवडणुकीसाठी तयार राहा, असे आवाहन लोकनेते गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले. नवी मुंबई शहराचा विकास हा कुणी केला हे सांगण्याची गरज आता जनतेला नाही. पाच वर्षात नवी मुंबईत कोणतेे नवे काम राज्यातील सत्ताधार्यांनी केले आहे, ते दाखवा असे आव्हान लोकनेते गणेश नाईक यांनी विरोधकांना केले. नवी मुंबईतील विकास कामामध्ये खो घालणार्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आल्याचे लोकनेते नाईक म्हणाले.
* केवळ श्रेय घेण्यात विचारेंना रस
नवी मुंबई, ठाण्यात डॉ.संजीव नाईक यांनी केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचे काम पाच वर्षात खासदार राजन विचारे यांनी केले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट, दिघा रेल्वे स्टेशन, प्रस्तावित दोन नवे रेल्वे स्थानक, भाईंदरमधील विकास कामे डॉ.नाईक यांनी केली आहेत. याचा विसर विचारेंना पडला आहे, अशी टीका परांजपे यांनी केली.
*शिवसेना-स्वाभिमानचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत
शिवसेनेचे माजी आमदार घनश्याम शेलार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत सेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर नवी मुंबईतील स्वाभिमान संघटनेचे वशिष्ट यादव यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.