सुजित शिंदे : 9619197444
भाग – १, बेलापुर विधानसभा मतदारसंघ
नवी मुंबई : लोकसभा निवडणूका एप्रिलमध्ये होणार असल्या तरी नवी मुंबईकरांना खरी उत्सूकता आहे ती ऑक्टोबर २०१९ होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची. लोकसभा निवडणूकीत आघाडी व युती या दोन्ही पक्षांचे उमेदवार ठाण्याचे असले तरी या निवडणूकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कंबर कसून परिश्रम करणार असल्याचे आताच स्पष्ट होवू लागले आहे. अवघ्या सहा महिन्यावर विधानसभेच्या निवडणूकीसाठी लोकसभा निवडणूक ही रंगीत तालीम असल्यामुळे प्रत्येक जण आपला विधानसभेसाठी असणाऱ्या जनाधाराची चाचपणी या लोकसभेच्या निवडणूकीच्या माध्यमातून करून घेणार आहे. सोशल मिडीया आणि बॅनरबाजीमध्ये आक्रमक असणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रत्यक्षांत बेलापुर व ऐरोली मतदारसंघात पाळेमुळे मजबूत नसल्याचे दिसून येत आहे. बेलापुर मतदारसंघात भाजपने पडद्याआडून केलेली मोर्चेबांधणी व राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपची जनसंपर्कात असलेली आघाडी यामुळे बेलापुरच्या भाजपच्या गडाची तटबंदी अजूनही भक्कम असल्याचे पहावयास मिळत आहे. ऐरोलीच्या तुलनेत बेलापुरात राष्ट्रवादी अजूनही कमजोरच आहे. येत्या सहा महिन्यात हे चित्र राष्ट्रवादीने न बदलल्यास गतविधानसभा निवडणूकीतील पराभवाचा वचपा काढण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.
गणेश नाईक बोले आणि नवी मुंबई डोले असे महाराष्ट्राच्या राजकारणात कालपरवापर्यत चित्र निर्माण झाले होते. ऑक्टोबर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व नवी मुंबईचे शिल्पकार म्हणविल्या जाणाऱ्या लोकनेते गणेश नाईकांना भाजपच्या मंदाताई म्हात्रे यांच्याकडून अवघ्या १३०० मतांनी पराभूत व्हावे लागले. मुळातच हा पराभव मोदी लाटेमुळे झाला असल्याचे लंगडे समर्थन राष्ट्रवादीच्या गोटातून केले जात असले तरी गणेश नाईकांच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे प्रचार यंत्रणा राबविताना केलेला गाफीलपणा, सरदारांवर दाखविलेला अतिआत्मविश्वास, पदाधिकारी कसा प्रचार करतात याकडे केलेले दुर्लक्ष, थेट लोकांमध्ये संपर्क करण्यास गणेश नाईकांनी दाखविलेली उदासिनता या प्रमुख बाबींचा त्यात हातभार लागलेला आहे. गणेश नाईकांच्या पराभवामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितके नुकसान झाले त्याहीपेक्षा कैकपटीने अधिक नवी मुंबईचे नुकसान झालेले आहे. गणेश नाईकांच्या पराभवास प्रचार यंत्रणेतील गाफीलपणा ही मुख्य बाब कारणीभूत ठरली आहे. शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांची प्रचार व जनसंपर्काची सकाळी एक फेरी पूर्ण व्हायची, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकांश नगरसेवक अंघोळ करून सकाळी साडे अकरा –बाराच्या सुमारास कार्यालयात येत असलेले पहावयास मिळाले. एप्रिल २०१५ला झालेल्या पालिका निवडणूकीत मात्र हेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधी दिवसरात्र जागे राहून प्रचारात आघाडी घेताना स्वत: निवडून आले. मात्र विधानसभा निवडणूकीत हेच परिश्रम, आक्रमकता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी दाखविली नाही. लोकनेते गणेश नाईकांना ज्या पालिका प्रभागात पिछाडी होती, त्याच पालिका प्रभागात अवघ्या ६ महिन्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दणदणीत मतांनी विजयी होतात. याचाच अर्थ गणेश नाईकांच्या पराजयापेक्षा संबंधितांना आपला विजय महत्वाचा वाटत असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. प्रचारात शिवसेनेचे विजय नाहटा व भाजपच्या मंदाताई म्हात्रे जनसामान्यात मिसळत असताना अनेक प्रभागामध्ये लोकनेते गणेश नाईकांनी रथातून उतरणेही टाळले होते, तीच चूक त्यांना महागात पडली.
विधानसभा निवडणूकीतील राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांनी व शिवसेनेच्या विजय नाहटांनी काही काळ पत्करलेली अलिप्तता ही आज भाजपसाठी फायदेशीर ठरली आहे. भाजपच्या मंदाताई म्हात्रेंनी या काळात प्रत्यक्षांत जनसंपर्कावर व भेटीगाठीवर भर दिल्याची बाब आज शिवसेनेच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपला फायदेशीर ठरली आहे. आमदार मंदाताई म्हात्रेंनी आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघातील अधिकांश गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देवून लोकांशी सुसंवाद साधला आहे. महिला वर्गाला हक्काने चहा कराययला लावून तास-दोन तास गप्पा मारत एक जिव्हाळा निर्माण केला आहे. एकीकडे लोकनेते गणेश नाईकांनी त्यांच्या काळात असा गृहनिर्माण सोसायट्यांशी संवाद साधला नव्हता. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकनेते गणेश नाईकांनी केलेले कार्य उल्लेखनीय असले तरी तळागाळाशी संपर्क करण्यास गणेश नाईकांना मर्यादा पडल्या. ते या बाबतीत पदाधिकारी व नगरसेवकांवर अवलंबून राहीले. परिणामी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरसेवक संस्थानिक बनत गेले. खरा राजा असणारे लोकनेते गणेश नाईक जनसंपर्कात पिछाडीवर पडत गेले.
आता अवघ्या सहा महिन्यावर बेलापुर विधानसभेच्या निवडणूका येवून ठेपल्या आहेत. सोशल मिडीयावर लोकनेते गणेश नाईकांची पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसची बाजू मांडताना नाईकांची सोशल मिडिया सांभाळणाऱ्या मोजक्या चेहऱ्यांचा आक्रस्ताळेपणाही सुजाण व प्रगल्भ मतदारांसाठी संतापाची बाब बनत आहे. मोदी लाट ओसरल्याचा टाहो विरोधकांकडून कितीही फोडला जात असला तरी प्रत्यक्षात परप्रातिंय मतदार आजही भाजपसोबत असल्याची बाब आमदार मंदाताईंना फायदेशीर ठरणार आहे. बेलापुर मतदारसंघात स्वत:चा मतदारसंघ सोडून जवळच्या चार-पाच मतदारसंघात प्रभाव टाकू शकेल असा एकही नगरसेवक बेलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाही. अजून विधानसभेला सहा महिन्याचा अवकाश आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस अजूनही बेलापुरात भाजपच्या तुलनेत कमजोर आहे. प्रत्यक्ष जनसंपर्कात लोकनेते गणेश नाईक हे आमदार मंदाताईच्या तुलनेत कोसो मैल पिछाडीवर आहेत. नगरसेवक व पदाधिकारी काही हाताच्या बोटावर सोडल्यास बाकी सर्व सावळागोंधळ आहे. मागील पालिका निवडणूकीत मतदारांनाच नव्हे तर जवळच्या लोकांना दिलेली आश्वासने नगरसेवकांनी पूर्ण न केल्याने ही थापेबाजी आता त्या नगरसेवकाच्या अंगलट येवू लागली आहे. त्यातच नगरसेवक विकासकामांच्या नावाखाली एकटाच ठेकेदाराकडून मिठाई लाटत असल्याने व पक्ष संघटना तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या मिठाईचा स्वाद सोडा पण सुंगधही झिरपत नसल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी उघडपणे आता नाराजी व्यक्त करू लागले. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीला विश्वासात नाईक परिवाराने न घेतल्यास ठेकेदारांच्या आहारी गेलेल्या नगरसेवकांवर विसंबून ऑक्टोबरची विधानसभा काढणे लोकनेते गणेश नाईकांना अवघड होवून बसणार आहे.