सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मागील लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ऐरोली व बेलापुर विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईचे शिल्पकार म्हणविल्या जाणाऱ्या लोकनेते गणेश नाईकांच्या राजकीय साम्राज्याला तडे गेले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत तत्कालीन खासदार डॉ. संजीव नाईक यांना तब्बल ४७ हजारांनी पिछाडीवर जाण्याची वेळ आली. बेलापुर विधानसभा मतदारसंघात २२ हजारांनी तर ऐरोली विधानसभा मतदारसंघात २५ हजारांची आघाडी ठाणेकर उमेदवार असलेल्या राजन विचारेंना मिळाली. मोदी लाटेच्या करिश्म्यामुळे राजन विचारे त्या परिस्थितीत तब्बल २ लाख ८४ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. परंतु वर्षानुवर्षे राजकीय गढ असणाऱ्या नवी मुंबईत मोदी लाटेमुळे गणेश नाईकांच्या गढाला तडा जाणे हीच धक्कादायक बाब आहे. पाच वर्षात जनता दरबाराच्या माध्यमातून तळागाळातील जनतेशी साधलेली जवळीक, पालिका नगरसेवकांचे सर्वाधिक विखुरलेले जाळे, सर्वाधिक कार्यकर्ते व अधिकाधिक प्रभावी प्रचारयंत्रणा असतानाही गणेश नाईकांचे राजकीय साम्राज्य ४७ हजाराच्या पिछाडीने खिळखिळे व्हावे ही बाब आकलनापलिकडील आहे. राजकारणात विजय-पराभव होत असतो. परंतु होमपीचवर सर्वाधक काम करूनही मतदारांनी नाकारणे ही आत्मपरिक्षणाची बाब आहे. लोकसभेनंतर अवघ्या पाचच महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत बेलापुरात गणेश नाईकांना अवघ्या १३०० मतांनी पराभूत व्हाबे लागले. नशिब, ऐरोलीत नऊ हजाराच्या मताधिक्याने आमदार संदीप नाईकांनी आपला गढ राखल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसची पर्यायाने नाईक परिवाराची पत काही प्रमाणात कायम राखली गेली. विधानसभा निवडणूकीनंतर अवघ्या सातच महिन्यांनी झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला काठावरचे बहूमत मिळाले. बेलापुर विधानसभा मतदारसंघाचा विचार करावयचा झाल्यास त्या मतदारसंघातून लोकनेते गणेश नाईक १३०० मतांनी पराभूत व्हावे लागले, त्याच मतदारसंघात पालिका प्रभागाचा विचार केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी थोडीथोडकी नव्हे तर काही हजारांच्या घरात होती. ज्या प्रभागामध्ये लोकसभेला डॉ. संजीव नाईक, लोकनेते गणेश नाईकांना पिछाडी होती, त्याच प्रभागात दणदणीत मताधिक्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विजयी झाले. याचाच अर्थ स्वत:ची जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी दादांसाठी व प्रथम महापौरांसाठी गांभीर्याने प्रयत्न केलेच नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षबांधणी नवी मुंबईत प्रारंभापासूनच खिळखिळी आहे. पदाधिकाऱ्यांचे कार्य केवळ बॅनरवर दिसण्यापुरते असून लोकांमध्ये दिसत नाही. पालिका सभागृहात जे मातब्बर आहेत, बोनकोडेच्या आशिर्वादाने स्थानिक भागात नावाजले आहेत, त्यांचा प्रभाव त्यांचा प्रभाग सोडल्यास सभोवतालच्या प्रभागातही दिसत नाही. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महिला, पुरूष व युवक हे तीनही जिल्हाध्यक्ष ग्रामस्थच आहेत. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांवर नजर मारल्यास राष्ट्रवादी कॉग्रेसने ग्रामस्थांनाच अधिक पसंती दिलेली आहे. लोकसभेपाठोपाठ अवघ्या सहा महिन्यांनी विधानसभेच्याही सार्वत्रिक निवडणूका होणार आहे. ही लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम आहे. मोदी लाट काही प्रमाणात ओसरली असली तरी अमराठी घटकांवर आजही मोदींचा प्रभाव कायम आहे. त्याच शिवसेनेकडून विचारेंना मत म्हणजे मोदींना मत, मोदींच्या स्थिर सरकारला मत असा प्रचार सुरू केल्याने अमराठी घटक लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडे फारसा झुकण्याचीही शक्यता नाही. त्यातच गेल्या तीन-चार वर्षापासून नाईक परिवाराच्या राजकीय अस्तित्वाबाबत वेगवेगळ्या अफवा अचानक निर्माण होत आहेत. कदाचित या चर्चेमागे अथवा अफवेमागे नाईक विरोधकांचेही राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी कालपरवाही वर्तमानपत्रात नाईक परिवार शिवसेनेत परतणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्याअगोदर नाईक परिवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा जनसामान्यांत पसरविल्या जात होत्या. नाईक परिवार भाजपात अथवा शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेने अथवा अफवेने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारीही गेल्या काही वर्षापासून संभ्रमावस्थेच फिरत आहेत. नेतेमंडळींच जाणार असतील दुसरीकडे तर आपण का म्हणून राष्ट्रवादीचा प्रचार करून भाजप व शिवसेनेच्या स्थानिक घटकांशी वैर स्वीकारायचे असा विचारही कार्यकर्ते बोलून दाखवित आहे. शिवसेनेत जाणार म्हणून बातम्या प्रसिध्द होताच कार्यकर्त्यांनी खासगीत रागही व्यक्त केला. ज्यांनी चालविला बावखळेश्वरवर हातोडा, आता त्यांच्याशी कशाला परत नाते जोडता असा संतापही व्यक्त केला गेला. कोपरखैराणेची सभा वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रचाराच्या फारशा हालचालीही दिसत नाही. दुसरीकडे शिवसेना नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी यांनी मात्र भेटेल तिथे मतदारांशी संपर्क मौखिक पातळीवर राजन विचारेंचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत व पदाधिकाऱ्यांत शांतता आहे. लोकसभा निवडणूका ही विधानसभेची चाचपणी असल्याने नाईक परिवाराला पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रचारात मुसंडी मारावी लागणार आहे. ठाणे लोकसभेचा निकाल काहीही लागो, पण ऐरोली व बेलापुरात राष्ट्रवादीने मतामध्ये आघाडी घेतली तरच कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे उधाण येणार आहे. पिछाडी मिळाल्यास कार्यकर्ते हताश व निराश होतील आणि खांदे पडलेल्या कार्यकर्त्याच्या पाठबळावर विधानसभा जिंकणे नाईक परिवारासाठी अवघड होवून बसेल. त्यामुळेच नगरसेवकांबरोबरच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून नाईक परिवाराला प्रचारयंत्रणा राबवावी लागणार आहे. जाणार की राहणार या अफवांचे खंडण करून कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करावा लागणार आहे. रात्र वैऱ्याची आहे, गाफीलपणा बाळगल्यास बोनकोडेच्या राजकारणालाच पूर्णविराम लागण्याची भीती आहे. पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी जनसामान्यांत वावरावेच लागेल. कोणावरही प्रचारयंत्रणेत विसंबून न राहता नाईक परिवाराला स्वत: आघाडीवर राहून आक्रमकता दाखवावी लागणार आहे. विधानसभेची रंगीत तालीम ही लोकसभा निवडणूकांच्या माध्यमातूनअनायसे चालून आलेली संधी आहे. अमराठी घटकांना आपणाकडे वळविण्यास आपणाला कितपत यश येते हेही समजण्यास मदत होणार आहे.