श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्हा, रायगड या भागातील प्रचाराचा अंतिम टप्पा शनिवारी सांयकाळी ५ वाजता संपुष्ठात आला. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपेक्षा प्रस्थापित नगरसेवकांनी व पालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांनीच अधिक परिश्रम केल्याचे पहावयास मिळाले. उमेदवारांऐवजी प्रस्थापितांनी व इच्छूकांनीच प्रचाराचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत जनसंपर्कासाठी तारेवरची कसरत केल्याचे नवी मुंबईतील अनेक प्रभागामध्ये पहावयास मिळाले. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका जेमतेम वर्षावर आल्याने यानिमित्ताने आपली राजकीय ताकद आजमावत कोठे आघाडीवर आहोत व कोठे कमी पडणार आहोत याचाही कानोसा घेण्याचा प्रयत्न इच्छूकांनी व प्रस्थापितांनी यानिमित्ताने केला आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी असणारा विस्तीर्ण मतदारसंघ आणि त्यात येणारे सहा विधानसभा मतदारसंघ पाहता लोकसभा निवडणूक लढविणारे उमेदवार घरटी संपर्क करणे अशक्यच आहे. त्यामुळे पक्षसंघटनेचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, पदाधिकारी, मित्र पक्षाची रसद यावरच उमेदवारावर अवलंबून राहावे लागले आहे. त्यातच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकाही जेमतेम सहा महिन्यावर येवून ठेपल्याने लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील आघाडी व पिछाडीचा अंदाजही घेणे त्यानिमित्ताने शक्य होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेगळ्या असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणूकांतील मतदान व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये होणारे मतदान यामध्ये जमिन आसमानचा फरक असतो. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत पक्षावर मतदान होत असते तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पक्षाने दिलेला उमेदवार कोण आहे हे मतदारांवर अधिक प्रभाव निर्माण करणारे असते.
लोकसभा निवडणूकांसाठी नवी मुंबईत त्या त्या भागातील नगरसेवकांनी व नगरसेवक पदाची निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांनी प्रचारादरम्यान जनसंपर्कासाठी कंबर कसल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळाले. नगरसेवकावर नाराज असणाऱ्या स्वपक्षातीलच ‘बिभिषणांनी’ मात्र आपल्या उमेदवाराऐवजी दुसरा उमेदवार कसा प्रभावी आहे, हे सांगत आपल्या प्रभागातील पक्षाला होणारे मतदान कमी कसे होईल याचेही पडद्याआडच्या घडामोडीदरम्यान अभियान राबविल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळाले. पक्षाला मतदान कमी झाल्यास नगरसेवकाला वरिष्ठांच्या नाराजीचा सामना करावा लागावा यासाठी नगरसेवकावर नाराज असणाऱ्या पक्षातीलच नाराजांनी ‘चांगली’ तजवीज केल्याचे विविध घडामोडीदरम्यान दिसून आले. नेतेमंडळींसमोर चमकेशगिरी करणाऱ्या अनेक पक्षीय पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्रामध्ये बसविण्यासाठी माणसेही भेटत नसल्याचे निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात पहावयास मिळाले. पाहिजे तर एका दिवसाचे तीन हजार देतो, पण मला मतदानाच्या दिवशी शाळेत बसण्यासाठी माणसे व रिलीव्हर द्या म्हणून इतर पक्षातील मित्र मंडळींकडे विनंती करणारेही अनेक चमकेश घटक ठिकठिकाणी पहावयास मिळाले. लोकसभा निवडणूकीमध्ये उमेदवारांऐवजी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवकांनीच प्रतिष्ठेची केल्यामुळे निवडणूकीचा निकाल हा त्यांच्या परिश्रमाचा विजय-पराजय ठरणार असल्याचे बोलले जात आहे.