नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात ठोक मानधनावर मोठ्या प्रमाणावर कामगार काम करत आहेत. ठोक मानधनावर काम करणारे कामगार प्रामाणिकपणे व इमानेइतबारे काम करत आहे. महापालिका प्रशासनाला केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारामागे पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी व ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असलेले महत्वपूर्ण योगदान आज कोणालाही नाकारता येणार नाही. महापालिका प्रशासनानेही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सतत कामगारहितैषी भूमिका घेतलेली आहे. कायम कामगारांच्या धर्तीवर कंत्राटी व ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना ‘समान कामाला, समान न्याय’ या धर्तीवर पगार देताना औदार्य दाखविले आहे. सध्या महापालिका प्रशासनाने कामगार व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कायम कामगार व अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासन देत असलेल्या सातव्या वेतन आयोगाचे आम्ही स्वागतच करत आहोत. आपण ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची युध्दपातळीवर कार्यवाही करावी. पालिका प्रशासनास ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यास काही प्रशासकीय व तांत्रिक अडचणी असतील तर किमान या ठोक मानधनावरील कामगारांच्या वेतनात समाधानकारक वाढ करून त्यांच्या कष्टाचा मानसन्मान राखला जावा अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.