स्वयंम न्यूज ब्युरो
मुंबई – अर्जुनाचे संपूर्ण लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर होते त्याप्रमाणे या विधानसभा निवडणूकीत काही झाले तरी पक्षाला यश देणारच अशाप्रकारे सर्वांनी काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसची बैठक रविवारी प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी त्यांनी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे संघटनेत एक अस्वस्थता होती. त्यामुळे हा मेळावा बोलावला आहे. असा निकाल लागणार असे अपेक्षित नव्हते मात्र पराभव मिळाला म्हणून खचून जायचे नसते. जय मिळाला म्हणून हवेत रहायचे नसते. जय – पराजय हा भाग असतोच. निकाल आपल्या बाजूला लागला नाही म्हणून नाउमेद होऊ नका असा सल्ला पवारांनी दिला. लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपाकडे चेहरा नाही. महाराष्ट्रात पर्याय कोण देवू शकतो असा लोकांना प्रश्न आहे. त्यामुळे आपण लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय द्यायचा. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवं असेही शरद पवार यांनी सांगितले.
तसेच काही दिवसांपूर्वी आरएसएस विषयीच्या माझ्या वक्तव्याबाबत संभ्रम निर्माण केला गेला. आरएसएसची विचारधारा स्वीकारा असे मी कधीच म्हणालो नाही. आरएसएसचे कार्यकर्ते ज्या चिकाटीने काम करतात त्याप्रमाणे आपण काम करायला हवे असे माझे मत होते असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. एक काळ होता तेव्हा आम्हाला ५४ लोकं सोडून गेले होते. फक्त ६ लोकं उरले होते. पण आम्ही जोमाने काम केले ६० लोकं निवडून आणले आणि सोडून गेलेल्या ५१ लोकांचा कार्यक्रम केला. आता आपल्याला पुन्हा त्याच जिद्दीने लढायचे आहे. काँग्रेस आघाडी करण्यावर ठाम आहे. आणखी समविचारी लोकांना एकत्र घेऊ आणि विधानसभा निवडणुकांना सामोरं जावू असा आत्मविश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.