अवघ्या साडेतीन महिन्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. अडीच महिन्यानंतर आचारसंहिता लागेल. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका जिंकण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीने व शिवसेना-भाजपच्या महायुतीने मागील काही महिन्यापासूनच कंबर कसली आहे. मोर्चेबांधणीलाही सुरूवात केलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रामध्ये भाजप-सेना युतीने मुसंडी मारल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या पाच जागांवर तर कॉंग्रेसला अवघ्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेला १८ जागा तर भाजपला २३ जागा मिळाल्या. वंचित बहूजन आघाडीने खैरे-जाधव वादात आपले खाते उघडले.
सर्वप्रथम नवी मुंबई कार्यक्षेत्राचा विचार केल्यास नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये बेलापुर विधानसभा मतदारसंघातून युतीला ३९ हजाराचे तर ऐरोली विधानसभा मतदारसंघातून ४२ हजाराचे मताधिक्य प्राप्त झाले. बेलापुरमध्ये भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या आहेत तर ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप नाईक हे आहेत. अर्थात लोकसभेचे मतदान आणि विधानसभेचे मतदान यामध्ये फरक पडतो. लोकसभेला केवळ आणि केवळ मोदी या नावावरच मागील तसेच आताच्याही निवडणूकीत अनेक दगडांना मोदींकडे पाहत मतदारांनी शेंदूर फासल्याने त्याला देवत्व प्राप्त झाले आहे. मागील लोकसभा निवडणूकीतही बेलापुरमधून युतीला २५ हजाराची तर ऐरोलीतून २७ हजाराची आघाडी मिळाली होती. परंतु त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांना अवघे १३०० चे मताधिक्य तर ऐरोलीतून राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईकांना ८५०० चे मताधिक्य मिळाले होते. अवघ्या चारच महिन्यात हा राजकीय फरक व मतदानातील तफावत मतदारांच्या मानसिक बदलामुळे झालेली होती. त्यानंतर झालेल्या एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहूमत दिले.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात बेलापुर व ऐरोली असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. एकेकाळी नवी मुंबई म्हणजेच गणेश नाईक आणि गणेश नाईक म्हणजेच नवी मुंबई अशी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईची ओळख होती. गणेश नाईक बोले अन् नवी मुंबई डोले अशी येथील राजकीय रचना होती. पण काळाच्या ओघात सर्वकाही बदलले. एकेकाळी अवाढव्य असणारा बेलापुर विधानसभा मतदारसंघ आता केवळ वाशीगाव ते बेलापुरपर्यतच सिमित राहीला. नवनवीन राजकीय नेतृत्व उदयाला आले, पालिका स्तरावर जनतेनेही त्यांना स्वीकारले. विधानसभा मतदारसंघ लहान झाल्याने अनेकांच्या नगरसेवकांएवजी आमदारच होण्याच्या महत्वाकांक्षा वाढीस लागल्या. मागील विधानसभा निवडणूकीत गणेश नाईक पराभूत झाल्याने नवी मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही काही अंशी नाईक परिवाराचा दबदबा कमी झाला. हा दबदबा निर्माण करण्यासाठी नियतीने ऑक्टोबर २०१९ मध्ये येवू पाहणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून ती संधी प्राप्त झालेली आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्वकाही आलबेल आता पूर्वीप्रमाणे राहीलेले नाही. नाईकांच्याच छावणीतले मातब्बर सरदार आता नाईकांशी पूर्वीप्रमाणेच निष्ठावंत असतील याची कोणालाही आता शाश्वती देता येणार नाही. ऐरोली मतदारसंघातही नवनवीन नावे इच्छूकांच्या यादीत दाखल होवू लागली आहेत. नरेंद्र पाटलांसारखा माथाडी घटकातील पश्चिम महाराष्ट्रामधील मातब्बर मोहरा शिवसेनेच्या गळाला लागला. रमेश पाटलांना विधान परिषद देत भाजपनेही ऐरोलीत आपली पाळेमुळे रोवण्यास सुरूवात केली आहे. विजय चौगुले, एम.के.मढवी सारखी नावे सुरूवातीपासून चर्चेत आहेतच. बेलापुरात आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही आपले प्रस्थ चांगलेच निर्माण केले असून गणेश नाईक व विजय नाहटांच्या तुलनेत जनसंपर्कात मंदाताई म्हात्रे यांची बाजू आजही उजवी आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना थेट भेटी देत सदनिकाधारकांशी सुसंवाद करत व्यक्तीगत परिचय वाढविण्यात मंदाताई म्हात्रे आक्रमकता दाखवित आहेत. नाईक अजूनही प्रभागपातळीवर जनसंपर्कात कमी पडत असून मंदाताई म्हात्रे मात्र सर्वसामान्यांच्या निमत्रंणाचा स्वीकार करत हजेरी लावत आहेत. लोकसभा निवडणूकीत बेलापुरात राष्ट्रवादीच्या मातब्बरांना अगदी गणेश नाईक समर्थक म्हणून मिरविणाऱ्यांनाही करोडो रूपयांची कामे करूनही आपले प्रभाग टिकविता आले नाही.
नाईक परिवाराच्या पक्षांतराच्या वावड्या नेहमीच उठत असतात. मागील लोकसभेनंतरही उठल्या होत्या व आताही नाईकांच्या पक्षांतराच्या वावड्या जनसामान्यांत चर्चेला जोर धरू लागल्या आहेत. राष्ट्रवादीत राहून ऐरोली व बेलापुर काढणे म्हणजे नाईक परिवारासाठी अग्निदिव्य ठरणार आहे. त्यामुळे साहेबांनी भाजप नाहीतर सेनेत प्रवेश करावा असा सूर राष्ट्रवादीतील नाईक समर्थकांकडून आळविला जावू लागला आहे. लोकनेते गणेश नाईकांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले असले तरी कार्यकर्ते व पदाधिकारी मात्र चिंतातूर आहेत. विधानसभेला पडझड झाल्यास आपले राजकीय भवितव्य नामशेष होण्याची चिंता मातब्बरांच्या समर्थकांकडून उघडपणे व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणूक ही भाजप सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेससाठी महत्वाची असली तरी नाईक परिवार, मंदाताई म्हात्रे, विजय नाहटा तसेच ठाण्यातील रथी-महारथींसाठीही तितकीच प्रतिष्ठेची ठरणार आहे. ऐरोलीतील शिवसेनेवर ठाण्याचा प्रभाव आहे. भविष्यात संदीप नाईकांनी मागच्याप्रमाणे मोदी लाटेतही ऐरोलीचा गढ राखल्यास पाच वर्षे ठाण्यातील नेतृत्वाने ऐरोलीत केले काय असाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूकीला जेमतेम शंभर दिवसाचा कालावधी राहीलेला आहे. गणेश नाईकांना आपली गेलेली राजकीय पत मिळविण्यासाठी नवी मुंबईच्या सिंहाला आता गुहा सोडून जंगलात फिरावेच लागेल. कोल्हे-लांडगे यांच्यावर जंगलचा कारभार सोपविण्याची आजवर केलेली चुक आता घोडचुक ठरण्याची भीती असून असे झाल्यास जंगलातूनच वनराजाला हद्दपार होण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबईचे राजेपण सिध्द करण्यासाठी गणेश नाईकांना आता मैदानात उतरावेच लागेल. नगरसेवक तसेच पक्षीय पदाधिकाऱ्यांवर विसंबून न राहता प्रभागप्रभाग पिंजून काढण्यासाठी गणेश नाईकांना आता परिश्रमाची शिकस्त ही करावीच लागेल
:- सखापाटील जुन्नरकर
संपादक