स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रात मोठ्या होडीवाल्यांच्या तुलनेत राज्य सरकारकडून छोट्या होडीवाल्यांची उपेक्षा होत असून त्यांना कोणत्याही सुविधा भेटत नाही, सोसायटी बनविता येत नाही आदी समस्यांकडे लक्ष वेधत सारसोळे गावचे भुमीपुत्र व नवी मुंबई महानगरपालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे लेखी मागणी करत नवी मुंबईतील लहान होड्या असणार्या आगरी-कोळी समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलेे आहेे.
नवी मुंबई हे पूर्णपणे भूसंंपादन झालेेलेे एकमेव शहर आहेे. येथील ग्रामस्थांंनी भूसंपादन करताना कोणतीही खळखळ न करता, विरोध न करता शासनास सहकार्य केले आहे. नवी मुंबईमध्ये सिडकोकडून विकासप्रक्रिया राबविली जात असताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कोठेही आडकाठी घेतली नाही. उलटपक्षी सहकार्य केलेे आहे. योगदान दिलेे आहे. नवी मुंबई विकसित होण्यापूर्वी भातशेती व मासेमारी हीच दोन उपजिविकेची साधने होती. भूसंपादनामुळे येथील ग्रामस्थ भातशेतीला कायम मुकला आहे. तर कंपन्या, कारखान्यामुळे दूषित व रासायनिक पाणी येवून खाडीतील मासेमारीही कमी झाली आहे. वाशी खाडीपुलामुळेे अर्ध्याहून अधिक मासेमारीला ग्रामस्थ मुकला असल्याचे मनोज मेहेर यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
मोठ्या मच्छिमारांना सरकारकडून सुविधा मिळतात, पण लहान होड्या व हातहोडी चालविणार्यांना सरकारकडून आजतागायत कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेेली नाही. त्यामुळे श्रीमतांंना श्रीमंत करणे व गरीबाला गरीबच ठेवणे ही आजवरच्या सत्ताधार्यांची भूमिका राहीलेली नाही. मच्छिमार सोसायट्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. परंतु लहान होड्या व हातहोडी चालविणार्यांना मच्छिमार सोसायटी बनविता येत नाही. त्यामुळे त्यांना सरकारकडून कोणतीही मदत अथवा सुविधा उपलब्ध होत नाही. मोठ्या होड्यांप्रमाणेच लहान होड्या व हातहोडींना मच्छिमार सोसायटी बनविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि संबंधितांना निर्देश द्यावेत, ही नम्र विनंती. खाडीमध्ये व सागरात मासेमारी करताना मोठ्या होडीवाल्यांप्रमाणेच लहान होड्या व हातहोड्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. उलटपक्षी मोठ्या होडीवाल्यांच्या तुलनेत समुद्रात वा खाडीत समस्या निर्माण झाल्यास लहान होड्या व हातहोड्यांचे अधिक नुकसान होते व सरकार नुकसान झालेे म्हणून मोठ्या होडीवाल्यांना मदत करते. यातच आपणास विसंगती व दुजाभाव दिसून येईल. तरी सत्य परिस्थिती व समस्येचे गांंभीर्य पाहून आपण लहान होडी व हातहोड्यांनाही मच्छिमार सोसायटी बनविण्यासाठी सहकार्य करावे व संबंधितांना लवकरात लवकर निर्देश द्यावेत, अशी मागणी मनोज मेेहेर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.