सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई हे स्वच्छतेच्या दृष्टीने देशात सातवे व राज्यात पहिले तसेच निवासयोग्य शहरांमध्ये देशात दुस-या क्रमांकाचे मानांकित शहर असून सुरक्षेच्या दृष्टीनेही सुरक्षित शहर म्हणून ओळखले जावे ही भूमिका महापौर श्री. जयवंत सुतार यांनी विषद केली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखरेखीच्या दृष्टीने अत्याधुनिक सी.सी.टि.व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणेबाबतच्या महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आलेल्या प्रशासकीय प्रस्तावास सर्वानुमते मंजूरी प्राप्त होताना महापौर महोदयांनी ही भूमिका मांडली..
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी 2012 मध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 54 महत्वाच्या ठिकाणी 282 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमे-यांचा नियंत्रण कक्ष पोलीस मुख्यालयात असून विविध प्रकारचे गुन्हे व अपघातातील दोष उघडकीस आणण्यात या सी.सी.टी.व्ही. कॅमे-यांची मोठ्या प्रमाणावर मदत झाल्याची माहिती आयुक्तांनी याप्रसंगी सभागृहात दिली. शहर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत अशी मागणी मागील 2 वर्षांपासून सातत्याने नागरिक व नगरसेवक यांच्यामार्फत होत होती. याविषयी शासन स्तरावर खर्चाबाबत बैठकीही झाल्या होत्या. तथापि याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने व सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय असल्याने पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निश्चित करण्यात येऊन तशा प्रकारचा प्रस्ताव बनविण्यात आला.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची सर्व प्रवेश ठिकाणे म्हणजे ऐरोली-मुलुंड खाडीपूल, ठाणे दिघा प्रवेश ठिकाण, शिळफाटा जंक्शन, वाशी टोलनाका, किल्ले गांवठाण, बेलपाडा अशा सर्व प्रवेश ठिकाणी हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पिड कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात येणा-या वाहनांची माहिती संकलीत करण्याकरिता स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख (Automatic Number plate recognition) वाचणारे 54 ए.एन.पी.आर. कॅमेरे बसविण्यात येतील. प्रत्येक मुख्य चौकामध्ये एकूण चार हायडेफिनेश व हायस्पिड कॅमेरे आणि 27 मुख्य चौकांमध्ये साधारणत: 108 कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. याशिवाय रेल्वेस्थानक परिसर, सर्व बसडेपो, मार्केट, वर्दळीची ठिकाणे, उद्याने, मैदाने, तलाव, वाहतुक जंक्शन, चौक, नाके, मर्मस्थळे अशा एकूण 530 ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामध्ये 954 हायडेफिनेशन कॅमेरे, 396 पी.टी.झेड. कॅमेरे, 80 वाहनांच्या गतीची देखरेख करण्याकरिता स्पिडींग कॅमेरे, 9 खाडी व समुद्र किनारे यावरील देखरेखीकरिता देश विघातक व घातपात विरोधी कृत्यांवर नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या मागणीनुसार थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
याशिवाय महापालिका क्षेत्रात 43 ठिकाणी धोका असेल अशा आपत्कालीन परिस्थितीत सहाय्य करण्यासाठी सूचना देणारे पॅनीक अलार्म व कॉल बॉक्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच 126 ठिकाणी सार्वजनिक घोषणेकरीता पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. 59 ठिकाणी डायनॅमिक मेसेजींग साईनचा वापर करण्यात येणार असून या संपूर्ण प्रणालीवर नियंत्रणासाठी विभागनिहाय आठ स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी सर्व नियंत्रण कक्ष जोडण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे डेटा सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.
ही सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता कॅपेक्ससाठी अंदाजित रक्कम रु. 122.76 कोटी व ओपेक्स करीता अंदाजित रक्कम रु. 31.58 कोटी अशा एकूण 154.34 कोटी इतक्या खर्चास सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली असून यामध्ये 5 वर्षे लीझलाईन खर्च तसेच 5 वर्षे देखभाल दुरुस्ती खर्चाचा समावेश आहे. इतर महानगरपालिकांमध्ये राबविलेल्या अशाप्रकारच्या सी.सी.टी.व्ही. यंत्रणेच्या खर्चाची तुलना केली असता नवी मुंबई महानगरपालिकेने अपेक्षित धरलेला खर्च कमी असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याविषयी माहिती देताना स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शहर सुरक्षेसोबतच गुन्हेगारीवर आळा बसण्याप्रमाणेच अपघात कमी होण्यात व हॉकर्स झोनवर लक्ष ठेवण्यात आणि इतरही कामात महानगरपालिकेस या यंत्रणेचा उपयोग होईल असे आयुक्तांनी सांगितले.
नवी मुंबई शहरला सुरक्षितता प्रदान करण्यात व येथील नागरिकांच्या त्यातही विशेषत्वाने महिला व मुलांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्यात ही सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उपयोगी ठरेल असे मत महापौर श्री. जयवंत सुतार यांचेसह सर्व नगरसेवकांनी व्यक्त केले.