दौऱ्यात आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मौलिक सूचना
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्तम प्रणाली म्हणून राष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली असून तुर्भे एमआयडीसी येथील भू भरणा पध्दतीवर आधारित शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पर्यावरणपूरक म्हणून सर्वत्र प्रशंसा केली जाते. तरीही अधिकाधिक सुधारणा करून येथील कार्यप्रणाली अधिक चांगली करण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष असून त्यांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांचेसह प्रकल्पस्थळाची बारकाईने पाहणी करून मौलिक सूचना करीत सुधारणा सूचविल्या.
यामध्ये प्रकल्पस्थळी सहाव्या सेलच्या पूर्ण झालेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. तसेच महसूल विभागाकडून नवी मुंबई महानगरपालिकेस या प्रकल्पाकरिता देण्यात येणाऱ्या साधारणत: ३३ एकर उर्वरित जमीन क्षेत्राची पाहणी केली. सदर जागेचे सीमांकन करून हे जमीन क्षेत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सध्या याठिकाणी सुरू असलेल्या रेट्रोफिटींग कामची पाहणी करताना त्या कामातील कम्पोस्ट मटेरिअलसाठी करण्यात येणारी फॅब्रिकेशन कामे अहोरात्र काम करून तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. याशिवाय ज्या ठिकाणी मिश्र कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते तेथील मटेरिअल रिकव्हरी सुविधा यंत्राचा पट्टा त्वरित नवीन बसवून घ्यावा असे त्यांनी सूचित केले, जेणेकरून कचरा वर्गीकरणाचे काम जलद व चांगल्या रितीने होऊ शकेल.
याशिवाय भू भरणा प्रकल्पाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला काँक्रिटचा प्लॅटफॉर्म पूर्णत: कव्हर करून त्या ठिकाणाहून पाणी व्यवस्थित वाहून जाण्यासाठी नवीन एकात्मिक प्रस्ताव तयार करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. औद्योगिक क्षेत्राच्या बाजूस पाचव्या सेलच्या वाहणाऱ्या लिचेडची योग्य रिताने विल्हेवाट लावण्याचे सूचित करतानाच प्रकल्प स्थळावरील बांधकाम आणि निष्कासित पाडकाम कचरा (C & D waste) प्रकल्प कामाची पाहणी करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अनेक देशी-परदेशी पर्यावरण तज्ज्ञांनी पाहणी करून त्याचे कौतुक केले असतानाही हा प्रकल्प नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करून अधिक अत्याधुनिक व्हावा हा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचा प्रयत्न असून त्यादृष्टीने प्रकल्पस्थळाची पाहणी करीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मौलिक सूचना केल्या.