सिडकोच्या भुखंडाची स्वच्छता करण्यास महापालिकेची चालढकल
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ८७ मधील रेल्वे रूळाला समांतर असलेल्या पश्चिमेकडील अंर्तगत रस्त्यालगत असलेले सिडकोचे अविकसित व बकाल अवस्थेत असलेल्याची भुखंडाची सफाई करण्यास चालू वर्षी महापालिका प्रशासनाकडून आजवर चालढकल केली जात आहे. सिडकोच्या अविकसित व बकाल भुखंडावर लांब फणा काढणारे नाग, साप व अन्य सरपडणाऱ्या विषारी श्वापदांचे स्थानिक रहीवाशांना दर्शन होवू लागले आहे. या भुखंडाच्या स्वच्छतेबाबत व तेथील सफाईबाबत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे या २७ जूनपासून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आज करतो, उद्या करतो असे सांगत महापालिका प्रशासनाकडून सिडकोच्या भुखंडाच्या स्वच्छतेबाबत चालढकल चालविली आहे. उद्या सर्पदंशाने कोणा स्थानिक रहीवाशांस काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सफाईच्या कामास चालढकल करणारी नवी मुंबई महापालिकाच जबाबदार राहील असा खणखणीत इशारा संतप्त होत शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिला आहे.
प्रभाग ८७ मध्ये रेल्वे रूळालगत सिडकोचे अविकसित भुखंड आहे. दरवर्षी या भुखंडाची सफाई, स्वच्छता नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असते. २०१० ते २०१५ या पाच वर्षाच्या काळात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून, तगादा लावून तत्कालीन शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी संबंधित भुखंडाची स्वच्छता व सफाई करून घेतलेली आहे. त्यानंतर शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी तेच कार्य पुढे चालू ठेवत भुखंडाची स्वच्छता करून घेतली आहे. यावर्षी महापालिका प्रशासनाकडून भुखंडाच्या स्वच्छतेस, सफाईस महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याने स्थानिक रहीवाशांच्या जिवितास साथीचे आजार अथवा सर्पदंशाची भीती यामुळे धोका निर्माण झाला असल्याची भीती शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी व्यक्त केली आहे.
प्रभागात असणाऱ्या सिडकोच्या अविकसित भुखंडावरील सफाई, स्वच्छता करण्यास व त्या ठिकाणी असलेला प्रभागाचा बकालपणा घालविण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याने संजीवनी, त्रिमूर्ती, उन्नती या सोसायट्यासह परिरसतील अन्य जिवितघटकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे सांगून शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे पुढे म्हणाल्या की, या सोसायट्यांच्या संरक्षक भिंतीलगत हे सिडकोचे अविकसित भुखंड आहे. या भुखंडावर कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. या भुखंडाच्या स्वच्छतेबाबत गेली १६ दिवस महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देत आहे. आजही पालिका अधिकाऱ्यांना हे भुखंड दाखवून समस्येचे गांभीर्य व साप-नागांमुळे सभोवतालच्या लोकांच्या जिवितास निर्माण झालेला धोका निदर्शनास आणून दिला असल्याचे शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी सांगितले.
त्रिमूर्ती सोसायटीतील रहीवाशी क्षिरसागर यांनी सोसायटी लगतच्या भुखंडावर फणा काढून बदलेला लांबलचक नागही पाहिला असल्याचे सांगून शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे पुढे म्हणाल्या की, हे विषारी नाग,साप घरात घुसू नये म्हणून या सोसायटीतील रहीवाशी दरवाजे बंद करून ठेवतात. सोसायटी आवारात मुले खेळत असली तर त्यांनाही सर्पदंशाचा धोका आहे. चुकून दरवाजा उघडा राहीला तर हे नाग-साप घरात घुसून लपण्याची शक्यता आहे. सिडकोच्या अविकसित भुखंडावरील घाणीमुळे व तेथील नाग-साप व सरपटणाऱ्या अन्य विषारी श्वापदामुळे येथील रहीवाशांना मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेवून वावरावे लागत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे साथीच्या आजारांचा उद्रेक होवून संबंधित गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांना लागण होण्याची भीती आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे काहीही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिला आहे. आज दुपारीही संबंधित भुखंडाची पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.