सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : जगभरात स्त्री-पुरूष समानतेचे वारे वाहत असतानाच तुघलकी कारभार करणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून मात्र पावसाळी साहित्याबाबत स्त्री-पुरूष यामध्ये दुजाभाव करण्यात येत आहे. यामुळे आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला वर्गात संताप व्यक्त करण्यात येत असून नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नाराजी व्यक्त करत असून इंटकच्यावतीने याचा पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे सांगितले.
महापालिका स्थापनेपासून आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला व पुरूष कर्मचाऱ्यांना पावसाळी साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये महापालिकेच्या भांडार विभागातून महिलांना चप्पल व छत्री तर पुरूष कर्मचाऱ्यांना गमबूट आणि रेनकोट वितरीत करण्यात येत असे. पावसाळा दरवर्षी असतानाही पावसाळी साहित्य मात्र महिला व पुरूष कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदाच देण्यात येत आहे. तथापि २०१७ सालापासून महापालिका प्रशासनाने महिला व पुरूषांना भांडार विभागातून पावसाळी साहित्य वितरीत करण्यास नकार देत त्याऐवजी आरोग्य विभागातील पुरूष व महिला कर्मचाऱ्यांनी स्वत: पावसाळी साहित्य खरेदी करावे व त्याची बिले सादर करावीत आणि देयके त्यांच्या बॅक खात्यात जमा कराण्यात येतील असे जाहिर केले. मात्र पावसाळी साहित्य खरेदी करण्याकरीता महिलांना ६९९ रूपये तर पुरूषांना १७९५ रूपये देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कामगारांना कळविण्यात आले. सफाई कामगारांना १८४९ रूपये देण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ६९९ रूपयांमध्ये १९९ रूपये चप्पल व ५०० रूपये छत्री असा समावेश आहे. पुरूष कर्मचाऱ्यांना ८९९ बूटासाठी व ८९६ रूपये असे १७९५ रूपये तर सफाई कामगारांना १९४९ रूपये देण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून पुरूष व महिला कर्मचाऱ्यांना पावसाळी साहित्याबाबत करणाऱ्या दुजाभावाबाबत महिला वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. या दुजाभावाबाबत महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांनी २०१७ साली महापालिका प्रशासनाकडून महिला कर्मचाऱ्यांनी पैसे स्विकारण्यास नकार दिला आहे. याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी १५ जुलै २०१७ रोजी पालिका आयुक्त, कॅफो व आरोग्य सभापतींना लेखी निवेदन देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तथापि पालिका प्रशासनाकडून महिला कर्मचाऱ्यांच्या नाराजीची आजतागायत कोणत्याही प्रकारची दखल घेतली न गेल्याचा संताप महिला कर्मचाऱ्यांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे.
छत्री जेमतेम दोन महिने टिकत नाही, पावसात जोराचा वारा आला तरी छत्री तुटते. तसेच कोणती पावसाळी चप्पल आता १९९ रूपयामध्ये मिळते. सामान्य दर्जाची पावसाळी चप्पलही ४०० ते ६०० रूपयांमध्ये मिळते. दरवर्षी नवीन पावसाळी चप्पल घ्यावी लागते, पालिका दोन वर्षातून एकदाच पावसाळी साहित्य देते असे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पुरूष कर्मचाऱ्यांप्रमाणेच रेनकोट देण्याची मागणी महिला कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दोन वर्ष टिकणारी पावसाळी चप्पलही पालिका प्रशासनाने १९९ रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचीही मागणी आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. पावसाळी साहित्य मिळते दोन वर्षांनी, त्यातही मिळणारी रक्कम तुटपुंजी, महिलांच्या तुलनेत पुरूष कर्मचाऱ्यांना अडीच ते पावणे तीन पट रक्कम अधिक यामुळे पालिका प्रशासनाचा महिला व पुरूषांमध्ये दुजाभाव करणारा तुघलकी कारभार उजेडात आला आहे. २०१७ साली एकाही महिला कर्मचाऱ्यांने पावसाळी साहित्याचे देयक सादर केले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
************************ ************************
महापालिका प्रशासनाकडून महिला व पुरूष कर्मचाऱ्यांमध्ये पावसाळी साहित्याच्या रकमेबाबत केला जाणारा दुजाभाव हीच मुळी संतापाची बाब आहे. पावसाळी साहित्य दोन वर्षाऐवजी दर वर्षी देणे आवश्यक आहे. पावसाळी साहित्याबाबत दिली जाणारी रक्कम तुटपुंजी आहे. याबाबत आम्ही सोमवारी, १५ जुलै रोजी महापालिका आयुक्तांकडे भेट घेवून महिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. आजच्या काळात महिला व पुरूष कर्मचाऱ्यांत पालिका प्रशासनाकडून पावसाळी साहित्यात केला जाणाऱ्या दुजाभावाचा इंटकच्यावतीने निषेध करत आहोत. ही विषमता मिटविण्यासाठीच आणि पुरूषांप्रमाणेच महिलांनाही रेनकोट देण्याची मागणी महिला कर्मचारी करत आहेत. महिलांना न्याय देण्यासाठी वेळ पडल्यास इंटक रस्त्यावर उतरून पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्याही अडविण्यास कमी करणार नाही.
- रवींद्र सावंत
- नवी मुंबई इंटक अध्यक्ष