सुवर्णा खांडगेपाटील
मुंबई : जेमतेम तीन महिन्यावर येवून ठेपलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आघाडी व महायुतीमध्ये खरी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागावाटपास चर्चा होण्यापूर्वीच निम्या जागांची मागणी करत कॉंग्रेसपुढे पेचप्रसंग निर्माण केला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एकीकडे शिवसेना आक्रमक झाली असली तरी मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद व महायुतीमध्ये असणाऱ्या मित्रपक्षांना सोडावयाच्या जागा यावरून वादाचा प्रसंग घडून भाजप युती तोडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्याची विधानसभेची मागील सार्वत्रिक निवडणूक ही युती व आघाडी तुटल्याने चौरंगी झाली होती. मोदी लाट असल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याचे भाजपने धाडस दाखविले होते. मोदीमय राजकीय वातावरण असल्याने त्यावेळी भाजपचा स्वबळावर लढण्याचा राजकीय जुगार कमालीचा यशस्वी ठरला होता. शिवसेनेला न घेता अन्य मित्र पक्षाच्या मदतीने भाजपने निवडणूक लढविली. भाजप हा राज्यामध्ये सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून नावारूपाला आला. १२२ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. अचानक भाजपने युती तोडल्याने एकाकी पडल्याने शिवसेनेनेही तत्कालीन स्थितीत प्रतिष्ठेचा मुद्दा बनवित स्वबळावर निवडणूक लढविली. शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आल्याने काही प्रमाणात शिवसेनेलाही आपली राजकीय पत टिकविण्यात यश मिळाले.
स्वबळावर सत्ता, स्वबळावर मुख्यमंत्रीपद ही भाजपची महत्वाकांक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात लपून राहीलेली नाही. अन्य राज्यात भाजपने मित्रपक्षांना संपविण्याचे अथवा कमकुवत करण्याचे काम करत आपले राजकीय प्रस्थ वाढविण्याचे काम मागील काही वर्षात नियोजनात्मक पध्दतीने केलेले आहे. गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षापासून त्यास सुरूवात झालेली आहे. आज गोव्यात भाजप सत्तेवर आहे तर मगोप अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रात मात्र शिवसेनेचे संघटनात्मक जाळे विखुरलेले असल्याने भाजपची खेळी महाराष्ट्रात यशस्वी होण्यास किमान दीड ते दोन दशकाचा कालावधी लागणार असल्याचे राजकारणात बोलले जात आहे. या कालावधीत मोदी लाट कितपत कायम राहील याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.
महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याचे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या मातब्बरांना निर्देश दिले आहेत. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची कितीही घोषणा केल्या तरी भाजप मुख्यमंत्रीपद सोडणार नाही. मागील विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहूमतासाठी भाजपला २२ जागा कमी पडल्या होत्या. सत्तेत राहून शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका बजावत सत्ताधारी भाजपला सतत अडचणीत आणण्याचे काम केले आहे. लोकसभा निवडणूकीत यशाचा अंदाज नसल्याने शिवसेनेला युतीसाठी चुचकारण्याची वेळ भाजपवर आली होती. तथापि मोदींची लाट या निवडणूकीत कायम राहीली नाही तर या लाटेचे महालाटेत रूपांतर झाले असल्याचा प्रत्यय भाजपच्या मंडळींना आला आहे. मागील वेळी २८२ जागा असणारा भाजप या लोकसभा निवडणूकीत ३००च्या पलिकडे जावून पोहोचला.
महाराष्ट्राचा विचार करावयाचा झाल्यास कॉंग्रेसचे मातब्बर नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील भाजपात दाखल झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचेही आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सूक आहेत. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचेही काही आमदार भाजपकडून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील घडामोडीचा व ताकदीचा अंदाज घेण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. शिवसेना वगळता महायुतीतील इतर मित्रपक्षांना भाजपच्या तिकीटावर निवडणूका लढविण्यासाठी दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे युती झाली तरी ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री या धोरणानुसार मुख्यमंत्री पद भाजपकडेच ठेवण्याची भाजपची खेळी आहे. जागावाटपात मतदारसंघाची संख्या व मतदारसंघाची अदलाबदल यावरून युतीत तणाव वाढवून अखेरच्या क्षणी सेना-भाजप युती तुटण्याचीच भीती कार्यकर्त्यात व पदाधिकाऱ्यांत व्यक्त केली जात आहे.