सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने स्थायी समितीपुढे मांडण्यात आलेल्या विविध नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावास सभापती नवीन गवते यांच्या अध्यक्षतेखाली मंजूरी लाभलेली आहे.
यामध्ये कोपरखैरणे विभागात रूग्णालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोपरखैरणे माता बाल रूग्णालयाकरिता मे.न्युक्लिअर हेल्थ केअर लिमी. या कंपनीच्या मालकीची सेक्टर 23, भूखंड क्र.. 4/ 1 ए येथील तयार इमारत खरेदीच्या प्रस्तावास स्थायी समितीची मंजूरी मिळाली. याबाबत सभापतींसह स्थायी समिती सदस्यांनी इमारतीची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. प्रस्तावास मान्यता देताना सदस्यांनी त्याठिकाणचे अतिक्रमण निष्कासित करणे, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व अनुषांगिक कामे पूर्ण करून नागरिकांसाठी महत्वाची अशी रूग्णालय सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. यामुळे कोपरखैरणे विभागातील नागरिकांची रूग्णालयाअभावी होणारी वैद्यकीय सेवेची अडचण दूर होणार आहे.
त्याचप्रमाणे, जुईनगर सेक्टर 23, भूखंड क्र. 67 या ठिकाणी 234.30 चौ.मी. भूखंड क्षेत्रफळात ग्रामपंचायतकालीन जुने पत्रा शेडचे मोडकळीस आलेले जोत्याचे बांधकाम आहे. ते तोडून त्याठिकाणी नागरिकांच्या विविध कार्यक्रमांच्या सोयीसाठी नवीन बहुउद्देशीय इमारत बांधण्याची मागणी महापौर जयवंत सुतार यांच्यामार्फत करण्यात आलेली असून त्यासाठी 50 लक्ष इतकी रक्कम महापौर निधीतून देण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. सदर बहुउद्देशीय इमारत बांधणे प्रस्तावासही स्थायी समितीची मंजूरी लाभल्याने या परिसरातील नागरिकांच्या लहानमोठ्या कार्यक्रमांसाठी एक चांगली वास्तू उपलब्ध होणार आहे.
अशाचप्रकारे, दिवाळेगाव येथील मच्छी मार्केटची झालेली दुर्दशा आणि त्यामुळे विक्रेत्यांची व नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन त्याठिकाणी मासळी मार्केट बांधण्याच्या प्रस्तावास मंजूरी लाभलेली आहे. सद्यस्थितीत मार्केटची दूरवस्था झाल्याने तसेच या मार्केटची जागा अपुरी पडत असल्याने मासळी विक्रेते रस्त्यावर बसतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरून रहिवाशांना त्रास होतो. त्यादृष्टीने याठिकाणी शेड स्वरूपात मासळी मार्केट बांधण्यात येत असून यामुळे मासळी विक्रेत्यांची, ग्राहकांची व तेथील रहिवाशांची चांगली सोय होणार आहे.