स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल असलेले कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील यांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि आमदार यशोमती ठाकूर यांना पाटील यांना भेटू न दिल्याने त्या हॉस्पिटल प्रशासक आणि पोलिसांवर चांगल्याच भडकल्या. आमदारास भेटू न देण्याच्या मुद्द्यावरून हॉस्पिटल प्रशासक आणि पोलिसांशी त्या हुज्जत घालत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हॉस्पिटलमध्ये हृदयरोगावर उपचार करण्यासाठी सेवा उपलब्ध नसताना आमदार पाटील यांच्यावर या हॉस्पिटलमध्ये उपचार कसा काय केला जात आहे?, असा प्रश्न उपस्थित करत ठाकूर यांनी प्रशासकाला जाब विचारत शिवीगाळ केल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.
सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये आमदार पाटील यांच्या भेटीसाठी गेलेल्या यशोमती ठाकूर रुग्णालय प्रशासकाला जाब विचारताना व्हिडिओत दिसत आहेत. उपस्थित महिला पोलीस कर्मचारी ठाकूर यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही एएनआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत दिसत आहे. ‘मला स्पर्श करू नका. माझ्याशी वाद घालू नका, मी आमच्या आमदाराला पाहण्यासाठी येथे आले आहे’, असे उत्तर संतप्त झालेल्या ठाकूर या महिला पोलीस कर्मचाऱ्याला देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये हृदयरोगावर इलाज करण्याची सुविधा उपलब्ध नसताना, पाटील यांना या हॉस्पिटलमध्ये का ठेवण्यात आले आहे, त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये का हलवण्यात येत नाही, असे प्रश्न विचारताना संतप्त झालेल्या ठाकूर यांनी रुग्णालय प्रशासकाचा हातही पकडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ठाकूर यांनी प्रशासकाला शिवीगाळ केली. तुम्ही पैसे खात आहात असा थेट आरोपही त्यांनी प्रशासकावर केला. या वेळी पोलिसांनी त्यांना, हे रुग्णालय आहे, येथे रुग्ण आहेत, तेव्हा ओरडू नका अशी विनंती करत त्यांना अडवले. यानंतर संतप्त झालेल्या ठाकूर यांनी त्यांना अडवणाऱ्या पोलिसांवरही त्यांनी आरोप केला. पोलीसही पैसे खाणाऱ्यांना मदत करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. या पूर्वी पाण्याच्या प्रश्नावरून एका बैठकीदरम्यान ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती. या बैठकीत तोडफोडही करण्यात आली होती.