सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागातील कामगारांच्या वेतन वाढीतील दहा महिन्याची फरकाची रक्कम संबंधित कामगारांना देण्यास महापालिका प्रशासन व संबंधित ठेकेदारांकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही दहा महिन्याची फरकाची रक्कम ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने यापूर्वीच दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मूषक नियत्रंण विभागातील कामगारांची वेतन विलंबामुळे आर्थिक ससेहोलटपट होत आहे. मूषक नियत्रंण विभागात पूर्वी ५० कामगार होते, आता काही महिन्यापूर्वीच या विभागात नव्याने २५ कामगारांची भरती केल्याने या विभागातील कामगारांची संख्या ७५वर गेली आहे. सकाळ व रात्र अशा दोन शिफ्टमध्ये मूषक कामगारांना काम करावे लागत आहे. अत्यंत घाणीमध्ये मूषक नियत्रंणचे काम करावे लागत असतानाही पालिका प्रशासन व ठेकेदार मूषक नियत्रंणच्या कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत नाही. या विभागाचा कार्यभार असणाऱ्या महापालिकेतील डॉक्टरांशी जवळचे संबंध असल्याने कामगार संघटनेच्या नेतेमंडळींनी मुषक नियत्रंणच्या कामगारांच्या समस्येवर आजतागायत प्रभावीपणे काम केलेले नाही. त्यातच नव्याने भरलेले २५ कामगार व जुन्या कामगारांतील अनेक कामगार ठेकेदारांनी नगरसेवकांच्या शिफारशीवर घेतलेले असल्याने महापालिका सभागृहातही मूषक नियत्रंणच्या कामगारांची बाजू मांडण्यास नगरसेवकांनीही आजतागायत विशेष स्वारस्य दाखविलेले नाही. मूषक विभागातील कामगारांना टॉर्च (विजेरी) व काठीदेखील स्वत:च्याच खर्चाने विकत घ्यावी लागत आहे.
मूषक विभागातील अनेक कामगारांना अवघ्या ५ हजारावर काम करावे लागले होते. आमदार संदीप नाईकांच्या निदर्शनास काही वर्षापूर्वी ही बाब आल्यावर त्यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांनाही पालिकेच्या अन्य कंत्राटी कामगारांप्रमाणेच वेतन देणे भाग पाडले होते.
मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन वाढल्यावर तब्बल दहा महिन्याचा फरक ठेकेदाराने आजतागायत या कामगारांना दिलेला नाही. ठेकेदार मनीला याप्रकरणी जाब विचारण्याचे धाडस महापालिका प्रशासन व नगरसेवकही दाखवित नसल्याने मूषक नियत्रंणच्या कामगारांना कोणीही वाली राहीला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.