सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिवसेना-भाजपातील युतीचा गोडवा संपुष्ठात येण्याची चिन्हे निर्माण झाली असून गतवेळप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा स्वबळावर लढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गतवेळी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरला होता. आताही स्वबळावर सत्तेवर येण्याची भाजपची महत्वाकांक्षा युती तुटण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा हाही कळीचा वाद ठरण्याची शक्यता आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असल्यामुळे भाजपने जागावाटपाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेची अडीच दशकापासून असलेली युती तोडली होती. त्यावेळी स्वबळावर झालेल्या निवडणूकीत भाजपचे १२२ तर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. त्यातच मागील पाच वर्षात भाजपची राज्यात ताकद मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे. अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छूक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत यंदा तर मोदींची लाट नाही तर महालाट असल्याचे मतमोजणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वबळावर सत्ता संपादन करण्याची भाजपची महत्वाकांक्षा वाढीस लागली आहे. सत्तेत असूनही भाजपला अडचणीत आणण्याचे काम सातत्याने शिवसेनेने केल्यामुळे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या भाजप व शिवसेनेत हालचाली सुरु असल्यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. बेलापुरात आमदार मंदाताई म्हात्रे या भाजपकडून तर राष्ट्रवादीकडून गणेश नाईकांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेकडून उपनेते विजय नाहटा हे विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने गेल्या अडीच वर्षापासून जय्यत तयारी करत आहेत, विवीध उपक्रम राबवित आहेत. ऐरोलीच्या तुलनेत बेलापुरात शिवसेनेची संघटना बांधणी उत्तम असून प्रभागाप्रभागात विजय नाहटांनी मागील काही काळापासून मोर्चेबांधणीही केलेली आहे. युती झाल्यास बेलापुरात नाहटाच्या तयारीवर पाणी पडण्याची भीती होती. बेलापुरात विजय नाहटा तर ऐरोलीतून एम.के.मढवी, विजय चौगुले, द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
स्वबळावर बळ आजमावण्यासाठी ऐरोली व बेलापुरातून शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. शिवसेना-भाजपमधील घडामोडीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घटक बारीक लक्ष ठेवून आहेत. गणेश नाईकांची ही शेवटची निवडणूक असल्याने नाईक समर्थकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. बेलापुरातील राष्ट्रवादी ही गटागटात पोखरली गेली असल्याने तसेच अनेक घटकांचा भाजपच्या मंदाताईशी प्रत्यक्ष संपर्क असल्याने नाईकांसाठी ही पक्षांर्तगत अडथळ्याची शर्यत ठरणार आहे. ऐरोलीत संदीप नाईकांसमोर तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांच्यासाठी निवडणूक अवघड नसली तरी बेलापुरात गणेश नाईकांना निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे. नाईकांच्या तुलनेत नाहटा व मंदाताईंचा जनसंपर्क ही उजवी बाजू आहे.